प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती : सार्वजनिक स्थायी समितीच्या बैठकीत घेतला निर्णय
बेळगाव : प्लास्टिकचा वापर करून रस्ते केल्यास खर्चामध्ये 10 टक्के बचत होते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर महानगरपालिका कार्यालयासमोरीलच काही मीटरचा रस्ता प्लास्टिक मिश्रित डांबरपासून केला जाईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत दिली. यावेळी डांबरमिश्रित केल्यानंतर पैशांची निश्चितच बचत होणार आहे. तसेच किमान 10 वर्षांपर्यंत तरी हा रस्ता खराब होणार नाही, अशी माहितीदेखील देण्यात आली. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक अध्यक्षा वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याचबरोबर शहरातील एलईडी बल्ब दुरुस्ती तसेच काही ठिकाणी पथदीप बसवायचे आहेत. त्यासाठी 5 पॅकेज करण्यात आले आहेत. त्या पॅकेजला देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
काही ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याबाबत चर्चा झाली. त्यालाही या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. कलमठरोड येथे महापालिकेची जागा आहे. तेथे सर्वांसाठी स्वच्छतागृह बांधावे, असे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर चर्चा होऊन बांधण्याबाबत मंजुरी देण्यात आली. यावेळी वाणी जोशी यांनीही अनगोळ येथील महानगरपालिकेच्या जवळ बीट कार्यालय परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले. याचबरोबर इतर विविध समस्यांबाबत चर्चा करून मंजुरी देण्यात आली. बैठकीला उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटाचे गटनेते राजशेखर डोणी इतर नगरसेवक, मनपा उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









