आज पृथ्वीवरील जवळपास सर्व स्थानांना मानवाचा स्पर्ष झालेला आहे. याचा अर्थ या जगात आज असे कोणतेही स्थान असे नाही, की जिथे मानव पोहचलेला नाही, असे मानण्यात येते. तथापि, अशी अनेक अपवादात्मक स्थाने आहेत, की जिथे इच्छा असूनही आजवर मानव पोहचू शकलेला नाही. भगवान शंकरांचे या पृथ्वीवरील सर्वात उंच स्थान असणारा कैलास पर्वत हे या स्थानांपैकी एक आहे.
आज श्रावण महिन्यातील चौथा आणि उपांत्य सोमवार असल्याने अनेकांना या कैलास पर्वताचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. या पर्वताच्या माथ्यावर आजवर मानव पोहचू शकलेला नाही. यापेक्षा उंच असणारी एव्हरेस्टसारखी शिखरे मानव सातत्याने पादाक्रांत करीत असताना, कैलास पर्वताचा माथा त्याच्या आवाक्यात अद्याप आलेला नाही, हे आश्चर्यकारक असले तरी सत्य आहे. त्यामुळे हे स्थान आजवर तरी ‘अस्पर्षकृत’ राहिलेले आहे. त्यामुळे या पर्वताची अनेक रहस्येही अद्याप गुप्तच राहिलेली आहे. मानव या पर्वताच्या माथ्यापर्यंत का जाऊ शकत नाही, याची वेगवेगळी कारणे दिली जातात. या पर्वताच्या माथ्यापर्यंत पोहण्याचा प्रयत्न केल्यास गिर्यारोहकांना विचित्र अनुभव येऊ लागतात. काही अंतर चढल्यानंतर गिर्यारोहक दिशाहीन होतो. त्यामुळे त्याला पुढचे आरोहण करता येत नाही आणि त्याला खाली उतरणे भाग पडते. हा पर्वत चढण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेले काही गिर्यारोहक म्हणतात की थोडे अंतर चढल्यावर अचानक त्यांचे केस आणि नखे झपाट्याने वाढू लागली. तसेच अनामिक भीती मनात संचारली. त्यामुळे त्यांना चढाई आवरती घ्यावी लागली. एकंदरीत हे एक दुर्गम आणि रहस्यमय स्थान आहे यासंबंधी तेथे गेलेल्या बहुतेकांचे एकमत आहे.









