संग्राम काटकर, कोल्हापूर
गेल्याच महिन्यात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी रांगेत उभारलेल्या अहमदनगरच्या भाविकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मंदिरात दवाखाना असता तर प्राथमिक उपचार करून भाविकांला सुरक्षीत ठेवता आले असते. मात्र,भाविकाला अन्य रूग्णालयात हालवताना वेळ निघून गेली होती. यात त्याचा मृत्यूही झाला. मात्र सारवासारव करत मंदिरात आरोग्य तपासणी केंद्र उभारून डॉक्टरही नेमू असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितले होते. परंतू सव्वा महिना पालटला तरी मंदिरात ना आरोग्य तपासणी केंद्रासाठी जागा निवडली आहे, ना डॉक्टर सक्रीय ठेवले आहेत. त्यामुळे भाविकांना सुविधा देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या यादीत आता आरोग्य केंद्राच्या प्रश्नही समाविष्ट झाला आहे.
अहमदनगरच्या भाविकाचा मंदिरात आलेल्या हृदयविकाराने निधन झाल्याची घटना अद्यापही ताजी असताना दोनच दिवसांपूर्वी दुपारी एकच्या सुमारास मंदिराच्या महाद्वाराजवळ एका महिलेला चक्कर येण्याचा प्रकार घडला. या प्रकाराची माहिती कळताच तीला खासगी दवाखान्यात नेण्यासाठी मंदिरातील कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. संबंधीत महिलेला मंदिराबाहेर नेण्यासाठी साधे ट्रेचरही मंदिरात नव्हते. काही सुरक्षा रक्षकांना मंदिराबाहेर धावत जाऊन देवस्थान समितीच्या रूग्णवाहिकेतील ट्रेचर मंदिरात आणले. या ट्रेचरवरून तिला भर उन्हात मंदिराबाहेरील रूग्णवाहिकेपर्यंत नेताना उन्हाचा तिच्या डोळ्यांना तडाखा बसत होता. कसे तरी सुरक्षा रक्षकांनी तिला रूग्णवाहिकेत ठेवून सीपीआरमध्ये उपचारासाठी नेले. उपचारानंतर संबंधीत महिला सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले. घडल्या प्रकाराने मंदिरात आता आरोग्य केंद्र असावेच लागेल, हा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. कारण आरोग्याची तक्रार आलेला प्रत्येक भाविक सुखरूपच राहिल, असे होणार नाही. त्यामुळे मंदिरात आरोग्य तपासणी केंद्र व तज्ञ डॉक्टरांचे पथक हे असावेच लागणार आहे.
असह्य करणारा उन्हाचा तडाखा…
पावसाळ्यातील काही महिने वगळता ऑक्टोबरपासून ते उन्हाळी सुट्टीपर्यंत अंबाबाईच्या दर्शनासाठी रोज हजारो कुटुंबे कोल्हापुरात येत असतात. त्यामुळे मंदिर व परिसरात दररोज 35 ते 39 हजार भाविकांचा वावर असतो. नवरात्रोत्सवात गर्दीत तर अनेकांची घुसमट होते. यातून काहींना चक्कर येते, उलट्या होतात. घाम सुटतो, डोकेदुखी सुरू होते. तर उन्हाळी सुट्टीत असह्य करणारे उन्ह 35 ते 39 अंश सेल्सीअसपर्यंत पडत आहे. या उन्हाचा तडाखा बसून काहीजण मंदिर व बाहेरील परिसरात चक्कर येऊन कोसळतात. यंदा तर गेल्या पावणे दोन महिन्यापासून बसत असलेला उन्हाचा तडाखा इतर लोकांप्रमाणे अंबाबाईच्या भाविकांनाही दर्शनास जातेवेळी सोसावा लागत आहे. गेल्याच महिन्यात दर्शनासाठी रांगेतून जात असलेल्या अहमदनगरच्या भाविकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. मंदिरात दवाखाना नसल्याने त्याला चांगल्या उपचारासाठी बाहेरील दवाखान्यात न्यावे लागले. यात बराच उशिर झाल्याने भाविकांचा मृत्यू झाला.
भाविकांच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको
उन्हाळ्याच्या दिवसात जसे मंदिरात भाविकांना चक्कर येण्याचे प्रकार घडतात, ते मंदिराबाहेरील भागातही चक्कर येण्याचे व सनस्ट्रोक बसण्याचे प्रकार कमी अधिक प्रमाणात घडत असल्याचे मंदिर परिसरातील दुकानदारच सांगताहेत. ज्याला चक्कर येते त्याला नातेवाईकच दवाखान्यात नेत असल्याने हे प्रकारच उजेडात येत नाही. शिवाय ज्यांना उन्ह असह्य होते, त्यांना यात्री निवासात अथवा मंदिराबाहेरील दुकानांमध्ये थांबवून बाकीचे नातेवाईक मंदिरात दर्शनाला जाताहेत. रांगेत अथवा मंदिरआवारात भाविकाला चक्कर आली तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी आवश्यक असलेले ट्रेचर घेण्यास सुरक्षा रक्षकांना मंदिराबाहेरील ऊग्णवाहिकेकडे धावत जावे लागते. हा प्रकार कुठे तरी थांबायला हवा. भाविकांच्या आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा व्हायला नको यासाठीची दक्षता म्हणून मंदिरात लवकरात लवकर आरोग्य तपासणी केंद्र हे सुऊच केलेच पाहिजे, अशी लोकभावना आहे. मात्र देवस्थान समिती लोकभावनेबाबत फारसे गंभीर नसल्याची सद्यस्थिती आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









