मगरींमध्ये पूर्वजांच्या आत्म्याचा वास
मगर अत्यंत क्रूर असल्याचे मानत तिच्या जवळ जाणे लोक टाळतात. मगरीला जगातील सर्वात घातक शिकारींपैकी एक मानले जाते. मगरीच्या जबड्यात सापडल्यावर तेथून जिवंत परतणे अशक्य मानले जाते. परंतु जगात एक असे ठिकाण आहे, जेथे मगरींना पवित्र मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. या मगरींमध्ये पूर्वजांचा आत्मा वास करून असल्याचे मानले जाते.
आफ्रिकेतील देश घाना येथे पागा भागात एक तलाव आहे. या तलावात 100 हून अधिक मगरी आहेत. यातील अनेक मगरींचे वय 80 वर्षांपर्यंत आहे. स्थानिक लोकांनुसार पूर्वजांचे आत्मे या मगरींमध्ये वास करून आहेत. या मगरींना जागं करायचे असल्यास त्यांच्यासमोर एक जिवंत कोंबडी ठेवली जाते आणि याद्वारेच त्यांची पूजा केली जाते.
आश्चर्याची बाब म्हणजे येथील लोक या मगरींसोबतच राहतात. या गावात ही परंपरा 600 वर्षांपासून चालत आली आहे. मगरी मानवी कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे वावरत असतात. त्या मोकळ्या वातावरणात हिंडतात आणि तलावात संचार करत असतात.
प्रत्येक कुटुंबाकडे स्वत:ची मगर

स्थानिक लोकांनुसार मगरींशी बोलत राहिल्यास त्या शांतपणे ऐकून घेतात. तुम्ही या मगरींना झोपण्यास सांगितले तर त्या झोपी जातात. तसेच या मगरी कुठे जात असतील आणि त्यांना हाक मारल्यास त्या थांबतात. येथे प्रत्येक कुटुंबाची स्वत:ची अशी मगर आहे. या मगरींना ही कुटुंब स्वत:चे पूर्वज मानतात असे स्थानिकांनी सांगितले आहे. आम्ही लहानपणी मगरींसोबत या तलावात पोहायचो. येथे आम्ही सर्व मिळून राहतो आणि आमच्या मुलांसोबत देखील या मगरी मैत्रिपूर्ण वागत असल्याचे वक्तव्य पियरे काबोर नावाच्या व्यक्तीने केले आहे.
बुर्किना फासोमध्येही हेच चित्रपट
पश्चिम आफ्रिकन देश बुर्किना फासोच्या बाजउले नावाच्या एका गावात तुम्हाला अनेक मगरी दिसून येतील. 14 व्या शतकापूर्वी या गावात कुणीच राहत नव्हते. तेव्हा मोठा दुष्काळ पडला होता, परंतु एकेदिवशी मगरींचा कळप येथे एका तलावानजीक आला होता, तेव्हापासून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याची वदंता आहे. येथे किती मोठा दुष्काळ पडला तरीही हा तलाव आता आटत नाही. त्याचमुळे या मगरींना येथे देवता मानले जाते.









