जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांना कधीही मुख्यमंत्रिपदाची संधीं मिळणार नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला आहे. सचिन पायलट हे नेता म्हणून बरेच सकीय आहेत. पण काँगेसला ‘धन’ पुरविण्याचे काम राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत करतात. कामापेक्षा काँगेसच्या दृष्टीने पैसा महत्वाचा असल्याने पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची संधीं कधीच मिळणार नाही, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले. राजस्थानात भाजपने ‘बूथ विजय संकल्प’ नामक कार्यक्रम सुरु केला आहे. त्याचा प्रारंभ करण्यासाठी शहा या राज्यात आले आहेत. राजस्थानात 7 महिन्यांनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. ती भाजप आणि काँगेस यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. गेहलोत यांचे हे थ्रीडी सरकार आहे. दंगे, दलितांवर अत्याचार आणि महिलांशी दुर्व्यवहार यासाठी या सरकारची प्रसिद्धी आहे. असे सरकार लोक विधानसभा निवडणुकीत पाडणार हे निश्चित आहे, असाही विश्वास शहा यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी गेहलोत कोणत्याही थराला जात आहेत. जयपूर बाँबस्फोटातील आरोपींची सुटका अभियोग नीट न लढविल्याने झाली. याला राज्य सरकार उत्तरदायी आहे, असा आरोपही शहा यांनी केला.









