डॉ. प्रभाकर कोरे यांचे मत : जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्यावतीने स्नेहमिलन
बेळगाव : वैद्यकीय क्षेत्रात भारताने जगभरात आघाडी घेतली आहे. आपल्या देशात तयार होणारी अनेक औषधे निर्यात होत असून, देशाची वैद्यकीय ताकद वाढत असल्याचे यातून दिसून येते. फार्मसीमध्ये स्पर्धा वाढली असून, फार्मासिस्ट हे एकप्रकारे डॉक्टरच आहेत, असे प्रतिपादन डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले. जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनच्यावतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर महांतेश कवटगीमठ, डेप्युटी ड्रग्ज कंट्रोलर डॉ. नागराज एस., असिस्टंट ड्रग्ज कंट्रोलर के. एस. मल्लिकार्जुन, असि. ड्रग्ज कंट्रोलर रघुराम निडावंद, असि. ड्रग्ज कंट्रोलर मनोहर के. व्ही., ड्रग्ज इन्स्पेक्टर रेणूप्रसाद एम. यू., ड्रग्ज इन्स्पेक्टर दयानंद काडदेवर, एस. जयराम उपस्थित होते.
कोरे पुढे म्हणाले, आपल्या देशात तयार होणारी औषधे अमेरिका, चीन, रशिया, युरोप आदी देशांमध्ये पुरविली जातात. भारताने वैद्यकीय क्षेत्रात जगभरात क्रांती घडविली आहे. स्पर्धा वाढली असली तरी याचा विचार न करता संयमाने व व्यावहारिकदृष्ट्या अविरतपणे या क्षेत्रात कार्यरत राहावे, असे त्यांनी सांगितले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बंडू सदलगे, नितिन झांवर, पवन देसाई, महेशगौडा पाटील, महेश बिळगी यांच्यासह तालुका पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बसवराज नाशिपुडी, विनायक बांदेकर तर सुधील नंजन्नावर यांनी आभार मानले.









