वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत भारतीयांवर होणारे हल्ले थांबत नाहीत. अलीकडच्या काळात भारतातील अनेक विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटबाहेर आणखी एका भारतीयावर हल्ला झाल्यानंतर मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. नुकताच विवेक तनेजा (41 वर्ष) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या भांडणात त्याचा बळी गेला असून पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मारहाणीची घटना 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 च्या सुमारास 15 व्या स्ट्रीट नॉर्थवेस्टच्या 1100 ब्लॉकमध्ये घडली. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता विवेक तनेजा हा फूटपाथवर पडलेला दिसला. रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झालेल्या विवेक तनेजाला ऊग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तनेजा आणि अन्य एका व्यक्तीमध्ये भांडण झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने तनेजाला जमिनीवर फेकल्याने त्याचे डोके फुटपाथवर आदळले, असे प्रारंभिक तपासात निष्पन्न झाले आहे









