ऑनलाईन टीम / तरुण भारत :
A permit from the municipality is required to keep a cat पुणेकरांना घरात मांजर पाळायचे असल्यास आता महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या यासंदर्भातील प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून, पुढील आठ दिवसात मांजर पाळण्यासाठीचा परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार, घरात मांजर, कुत्रा यांसारखे पाळीव प्राणी पाळायचे झाल्यास पालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करुन रितसर परवानगी घ्यावी लागते. पण अशा प्रकारची परवानगी घेण्याची नागरिकांची मानसिकता नाही. पुणे शहरात जवळपास 1 लाख पाळीव कुत्रे आहेत. पण केवळ 5500 कुत्र्यांची पालिकेकडे नोंद आहे. आता शहरात मांजर पाळण्याचे प्रमाणही वाढले आहे. शेजारच्या मांजरांचा त्रास होतो म्हणून अनेक तक्रारी आता पालिकेकडे येत आहेत. यापूर्वी मांजरांचे वाद पोलीस ठाण्यातही पोहचले आहेत. त्यामुळे आता कुत्र्यांप्रमाणे मांजरांचीही नोंद पालिकेकडे करावी लागणार आहे.
अधिक वाचा : द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगदा 2023 अखेरपर्यंत पूर्ण होणार
पालिकेने मांजरांची नोंदणी करण्यासाठी वार्षिक 50 रुपये निश्चित केले आहेत. नोंदणीसाठी नागरिकांचा रहिवासी पुरावा, मांजराचा फोटो आणि ॲन्टीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र लागणार आहे. दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. या परवान्याचे नूतनीकरण करताना 50 रुपये परवाना शुल्क अधिक 25 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.








