पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाला हा नेहमीच डोकेदुखी ठरत आहे. या नाल्यामुळे हजारो एकर जमिनीतील भाग पीक वाया जात आहे. यावषीही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने काम करण्याचे आदेश पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना दिले आहेत. बळ्ळारी नाल्याचे रुंदीकरण तसेच खोली वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे निश्चितच येथील शेतकऱयांना लाभ होणार आहे. तेव्हा लवकरच या कामाला सुरुवात केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टीमुळे दरवर्षी बळ्ळारी नाला परिसरातील शेतीला फटका बसू लागला आहे. या नाल्यामध्ये जलपर्णी वाढली आहे. याचबरोबर गाळही भरला आहे. महत्त्वाचे म्हणजे या नाल्यामध्ये अतिक्रमण झाले आहे. ते हटविणे महत्त्वाचे आहे. एकूणच या नाल्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱयांनी वारंवार केली आहे. मात्र, त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. आता पावसाळा कमी झाल्यानंतर तातडीने या कामाला सुरुवात होणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याबाबत तातडीने या नाल्याची खोदाई करावी, यासाठी आराखडा तयार करा, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठकीत सांगितले.
यावषी बळ्ळारी नाल्याला तीन वेळा पूर आला. त्यामुळे बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱयांना तीन वेळा फटका बसला. एकदा नुकसानभरपाई दिल्यानंतर दुसऱया वेळेला नुकसानभरपाई देणे अवघड आहे. मात्र, शेतकऱयांनी तीन वेळा खर्च करून भाताची लागवड केली. मात्र, आता ही भात पिके खराब झाली आहेत. त्यामुळे आता शेतकऱयांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. सध्या पालकमंत्र्यांनी बळ्ळारी नाल्याची खोदाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे. याचबरोबर कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे शेतकऱयांतून समाधान व्यक्त होत आहे.









