ग्रामस्थांमधून संताप : परिसरात पोलिसांनी गस्त घालावी
बेळगाव : अवचारहट्टी (येळ्ळूर) येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी असलेल्या शवदाहिनीचा काही भाग चोरट्यांनी लांबविला आहे. शवदाहिनीच्या खालील बाजूचा भिडाचा भाग चोरट्यांनी मोडून पळविला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असून आता अंत्यविधी करताना अडचण येणार आहे. मागील काही वर्षांपासून शवदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जात आहेत. भिडाच्या असणाऱ्या या शवदाहिनीचा काही भाग चोरट्यांनी लांबविला. गावापासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत हा प्रकार घडला आहे. या परिसरात भुरट्या चोरांची संख्या वाढली असून शेतकऱ्यांची लोखंडी अवजारे, वाहनांचे सुटे भाग तसेच रात्रीच्यावेळी पेट्रोल चोरीच्या घटनाही घडत आहेत.
अंत्यविधी करताना अडथळा
शवदाहिनी मोडून तिचे काही भाग लांबविल्याने आता अंत्यविधी करताना अडथळे येणार आहेत. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी. तसेच गावाला नवीन शवदाहिनी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.









