मिरज :
माजी पालकमंत्री व आमदार सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्याने मिरज मतदार संघात प्रलंबित असलेली रेल्वे प्रशासनाची प्रलंबित कामे सुरु होणार आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी मुंबई येथे आमदार खाडे यांनी भेट घेऊन चर्चा केली.
मिरज मतदार संघातील रेल्वे संदर्भातील विविध प्रलंबित कामे मार्गी लावावी, अशी मागणी केली. यावेळी महाव्यवस्थापकांनी सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयीजवळ समांतर पुल उभारण्यासह मिरज जंक्शन मॉडेल बनविण्यासाठी आराखडा मंजूरीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.
आ. खाडे यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांशी रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांबाबत चर्चा करुन मतदार संघातील प्रलंबित कामांचा आढावा सादर केला. मिरज जंक्शन मॉडेल स्टेशन करावे, सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रेल्वे उड्डाणपुल नव्याने बांधावे, मिरज-बेडग रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुल करावे, मिरज-पंढरपूर लाईनवरील सलगरे, बेळंकी, शिपुर, आरग, बोलवाड रोड येथील अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावरील साचलेल्या पाण्याचा निपटारा होण्यासाठी यंत्रणा उभी करावी, रेल्वे प्रशासनाच्या मोकळ्या जागांचे कॉंक्रिटीकरण करावे, मिरज रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण जलद गतीने करावे, अशी मागणी केली.
सदर कामांसदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही पत्रव्यवहार केल्याचे खाडे यांनी महाव्यवस्थापकांना सांगितले.
मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गावर सलगरे, बेळंकी, शिपुर, आरग, बोलवाड रोड येथे अंडरग्राऊंड ब्रिजच्या रस्त्यावर पावसामुळे पाणी साठत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल सुरू असल्याचे आमदार खाडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याठिकाणी चार-पदरी रस्ता करावा, दोन्ही बाजूस संरक्षक भिंती बांधाव्यात, पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.
मिरज रेल्वे स्थानक हे मॉडेल स्टेशन करण्याची घोषणा रेल्वेने यापूर्वीच केली होती. मात्र अद्याप नूतनीकरण सुरु झाल्याचे दिसून येत नाही. मिरज जंक्शन हे कर्नाटक सीमेलगतचे महत्वाचे असल्याने दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करतात. या स्थानकावर प्रवासी, नागरिक यांना योग्य त्या सुविधा मिळण्यासाठी व मध्य रेल्वेच्या आश्वासनानुसार मिरज रेल्वे स्थानक हे मॉडल जंक्शन बनविण्यासाठी नूतनीकरणाचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी खाडे यांनी केली.
महाव्यवस्थापक मीना यांनी खाडे यांच्या सर्व मागण्यांना सकारात्मकता दर्शवली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील जीर्ण उड्डाणपूल पाडून नवीन बांधणे आवश्यक आहे. मात्र, गैरसोय होऊ नये म्हणून समांतर पुल उभारण्याचा प्रस्ताव पाठविल्याचे महाव्यवस्थापकांनी सांगितले.








