बागायत खाते राबवतेय विविध प्रकल्प : फळ शेतीला प्रोत्साहन :
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱ्यांना बागायत शेतीबाबत आवड निर्माण होईल आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी बागायत खात्यामार्फत खानापूर तालुक्यातील शेडेगाळी येथे बागायत शेती फुलविण्यात येत आहे. तब्बल 30 एकर क्षेत्रात हिरवी फुंकर मारून खात्याने नंदनवन फुलविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या वर्षभरात बागायतप्रेमींना बागायत टुरिझम उपलब्ध केले जाणार आहे.
पारंपरिक फळ लागवडीबरोबर सफरचंद, जांमून, व्हॉईटबेरी, फणस यासह आंबा, पेरू, सीताफळ, चिकू आदी रोपांची लागवड करण्यात आली आहे. विशेषत: परदेशी फळांची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांना परदेशी फळांविषयी माहिती उपलब्ध व्हावी आणि उत्पादन व्हावे, यासाठी खात्याने परदेशी फळ रोप लागवडीला प्राधान्य दिले आहे. तब्बल 30 एकर क्षेत्रात बागायत, कंपोस्ट प्रकल्प, गो-शाळा, प्रशिक्षण केंद्र, नर्सरी, तलाव आणि इतर शोभिवंत प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात शेडेगाळी पर्यटनस्थळ म्हणून समोर येणार आहे.
नदीशेजारीच प्रकल्प असल्याने सर्व क्षेत्र हिरवाईने फुलणार
याबरोबरच रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोदाई केली जाणार आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची व्यवस्था होणार आहे. शिवाय या तलावातील पाण्याचा वापर फळ रोपांसाठी केला जाणार आहे. शेजारी असलेल्या मलप्रभा नदीतून पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. अगदी नदीशेजारीच हा प्रकल्प राबविला जात असल्याने सर्व क्षेत्र हिरवाईने फुलणार आहे.
प्रशिक्षण पेंद्र उभारणार
बागायत खात्यामार्फत या ठिकाणी कंपोस्ट खताची देखील निर्मिती केली जाणार आहे. पालापाचोळा आणि इतर टाकाऊ साहित्यांतून सेंद्रिय खताची निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील सेंद्रिय खताबाबत माहिती उपलब्ध होणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण पेंद्र देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक बागायती पिकांबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.
याबरोबरच या परिसरात नर्सरी उभारली जात आहे. त्यामुळे विविध रोपे उपलब्ध होणार आहेत. विशेषत: फळ रोपांची निर्मिती करून नागरिकांना पुरविली जाणार आहेत. यामध्ये परदेशी रोपांचा समावेश अधिक असणार आहे. स्थानिक वातावरणात सफरचंद आणि इतर फळांचे देखील उत्पादन कसे घ्यायचे? याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
30 एकर क्षेत्रामध्ये गो-शाळा
या 30 एकर क्षेत्रामध्ये जनावरांच्या देखभालीसाठी गो-शाळा उभारली जाणार आहे. त्यामुळे खानापूर परिसरातील जनावरांचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. भाकड म्हणजे दूध संपलेल्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा जनावरांना या गो-शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे गो-हत्या देखील कमी होणार आहे. एकूणच या मोठ्या परिसरात शेतीसंबंधी आणि इतर प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. शिवाय जिल्ह्यात एक मोठे नंदनवन बागायत खाते फुलविणार आहे.
संपूर्ण परिसर हिरवाईने नटणार
महांतेश मुरगोड (बागायत खाते सहसंचालक)
शेडेगाळी येथील 30 एकर क्षेत्रात सफरचंद यासह इतर परदेशी फळांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्याबरोबर कंपोस्ट प्रकल्प, गो-शाळा, प्रशिक्षण केंद्र आणि इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. संपूर्ण परिसर हिरवाईने नटणार आहे.









