थायलंडचा अवघ्या 37 धावांमध्ये धुव्वा, साखळी फेरीची विजयी सांगता
सिल्हेत-बांगलादेश / वृत्तसंस्था
गोलंदाजांनी तुलनेने दुबळय़ा थायलंडचा अवघ्या 37 धावात फडशा पाडल्यानंतर भारतीय महिला संघाने 9 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आणि महिला गटातील आशिया चषक टी-20 स्पर्धेत साखळी फेरीची विजयी सांगता केली. सात संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वलस्थानी विराजमान आहे. प्रारंभी, थायलंडचा डाव 15.1 षटकात 37 धावांवर खुर्दा झाला तर प्रत्युत्तरात भारताने 6 षटकात 1 बाद 40 धावांसह सहज विजय संपादन केला.
साखळी फेरीअखेर भारताने 6 सामन्यात 10 गुण मिळवले असून उपांत्य फेरीतील स्थान यापूर्वीच निश्चित झाले आहे. याशिवाय, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यासह थायलंड-बांगलादेश यांच्यातील एक संघ उपांत्य फेरीत खेळेल.
बांगलादेशचा आणखी एक सामना बाकी असून केवळ विजय मिळवला तरी त्यांना सहज आगेकूच करता येईल. बांगलादेशची धावसरासरी थायलंडपेक्षा सरस असल्याने याचा त्यांना लाभ होऊ शकतो. बांगलादेशने 5 सामन्यात 0.423 अशी सरासरी नोंदवली तर थायलंडची सरासरी 6 सामन्यात -0.949 इतकी राहिली आहे.
सोमवारी, भारताची हंगामी कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकल्यानंतर अजिबात वेळ न दवडता थायलंडला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि हा निर्णय सर्वार्थाने सार्थ ठरवला. थायलंडला 16 षटके फलंदाजी केल्यानंतरही केवळ 37 धावांवर समाधान मानावे लागले, यावरुन त्यांचा अननुभव अधोरेखित झाला.
नॅनापत कोंचारोन्कई (12) या एकमेव फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली. नतायाने दुसऱया क्रमांकाच्या 7 धावा केल्या. नॅनापत व चांथम यांची 13 धावांची सलामी डावातील सर्वोच्च भागीदारी ठरली. सलामी जोडी फुटल्यानंतर थायलंडच्या डावाला जणू सुरुंगच लागला. दीप्ती (2-10) व स्नेह राणा (3-9) या ऑफब्रेक गोलंदाजांनी सातत्याने थायलंड संघाला धक्के दिले. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडनेही (2-8) समयोचित साथ दिली.
विजयासाठी 38 धावांचे सोपे आव्हान भारताने 6 षटकात पार केले. सब्बिनेनी मेघनाने 18 चेंडूत नाबाद 20 तर पूजा वस्त्रकारने 12 चेंडूत नाबाद 12 धावांचे योगदान दिले. शफाली वर्मा 8 धावांवर बाद झाली. थायलंडतर्फे नतायाला 15 धावात एक बळी घेता आला.
संक्षिप्त धावफलक
थायलंड महिला संघ ः 15.1 षटकात सर्वबाद 37 (नॅनापत 19 चेंडूत 12, नताया 7, चांथम 6. स्नेह राणा 3-9, दीप्ती शर्मा 2-10, राजेश्वरी 2-8, मेघना सिंग 1-6).
भारतीय महिला संघ ः 6 षटकात 1 बाद 40 (सब्बिनेनी मेघना 18 चेंडूत नाबाद 20, पूजा वस्त्रकार 12 चेंडूत नाबाद 12, शफाली वर्मा 8. नताया 1-15, पुथवाँग 3 षटकात 0-25).









