वृत्तसंस्था/ श्रीनगर
आय लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात रियल काश्मिर एफसी संघाने नेरोका एफसी संघाचा 3-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या पराभवामुळे मणिपूरच्या नेरोका एफसी संघाची द्वितीय विभागात पदावनती झाली आहे.
शनिवारच्या सामन्यात रियल काश्मिर एफसी संघातर्फे क्रिझोने 35 व्या मिनिटाला, हैदर युसूफने 45 व्या मिनिटाला तर शेहर शाहिनने 67 व्या मिनिटाला गोल नोंदविले. या पराभवामुळे नेरोका एफसी संघाला स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. त्यांनी आतापर्यंत 21 सामन्यातून 13 गुण मिळविले आहेत. आता या स्पर्धेतील त्यांचे 3 सामने बाकी आहेत. नेरोका संघाची स्थिती खूपच चिंताजनक झाली असल्याने त्यांची आता द्वितीय विभागामध्ये पदावनती झाली आहे. दरम्यान गोव्याच्या चर्चिल ब्रदर्स आणि नामधारी संघांना चालू वर्षीच्या आय लीग हंगामात रिलेगेशनपासून वगळण्यात आले आहे.









