वृत्तसंस्था/ बार्सिलोना
येथे सुरू असलेल्या स्पॅनिश लिग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोना फुटबॉल क्लबने इलेचीचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात बार्सिलोनातर्फे लिवेनडोवेस्कीने दोन गोल नोंदवले.
या विजयामुळे बार्सिलोना संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले असून नजीकचा प्रतिस्पर्धी माद्रिदवर 15 गुणांची आघाडी घेतली आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीत बार्सिलोना संघाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. शनिवारच्या सामन्यात लिवेनडोविस्कीने 20 व्या आणि 66 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. अनसू फेटी आणि टोरेस यानी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात सेविलाने कार्डिझचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. सेविलातर्फे लुकास वोकेमपोस आणि युसुफ निसेरी यांनी प्रत्येकी एक गोल केला.









