शिक्षण विभागाचा प्रताप
बेळगाव : सरकारी विभागातील कर्मचारी कशा पद्धतीने आपले डोके चालवतील, याची शाश्वती नाही. क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात असाच एक प्रकार घडला आहे. बंद पडलेल्या चारचाकी वाहनाला नोटीस बोर्डप्रमाणे कागदपत्रे चिकटविण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात आठवडाभरापूर्वी शिक्षक बदलीसाठी कौन्सिलिंग सुरू होते. त्यावेळी अतिरिक्त शिक्षकांची यादी तसेच इतर माहितीपत्रे कार्यालय परिसरात लावण्यात आली. यातील काही कागदपत्रे नोटीस बोर्ड भिंतीवर लावण्यात आली आहेत तर काही कागदपत्रे चक्क चारचाकी वाहनावर लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. कौन्सिलिंगसाठी येणारे शिक्षक हा प्रकार पाहून आवाक्झा ले. धूळखात पडलेले जुने वाहन मागील वर्षानुवर्षे कार्यालयाच्या दारात सडत आहे. या चारचाकी वाहनावरच नोटीस व इतर माहिती लावण्यात आली आहे. जुन्या वाहनावर नोटीस लावणे शिक्षण विभागाला कितपत योग्य वाटते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.









