विटा :
विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गुरुवारी ४ ऑगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. अधिकाधिक भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तथा सांगली जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी दिलेली माहिती अशी, विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विटा शहरातील साळशिंगे रस्त्यावरील मैदानात भव्य असा हत्ती महल देखावा उभारण्यात आला आहे.
मंडळाचे कार्यकर्ते सौ यामिनी आणि सागर रोकडे या दांपत्याच्या हरते मुर्तीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर, कार्याध्यक्ष आमदार सुहास बाबर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, यांच्यासह मान्यवरांनी विट्याच्या राजाच्या दरबारात हजेरी लावून दर्शन घेतले. त्यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. गणेश स्थापना झाल्यापासून भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.
भाविकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुवार ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार ते दहा या वेळेत महात्मा गांधी विद्यामंदिराच्या पटांगणावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी विट्याच्या राजाच्या महाप्रसादाचा १५ हजाराहून अधिक भाविक लाभ घेतात. परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे.
- नऊ किलो चांदीची गदा अर्पण
दररोज हजारो भाविक विट्याच्या राजाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि मंडळाचे अध्यक्ष अमोल बाबर यांनी बाबर कुटुंबीयांच्या वतीने विट्याच्या राजाच्या चरणी नऊ किलो चांदीची गदा अर्पण केली. आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून ही गदा राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक संचालक अमोल बाबर, डॉ. शितल बाबर, शौर्य बाबर, राजवीर बाबर, जय बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय उपस्थित होते.








