वृत्तसंस्था/ बोगोटा, कोलंबिया
भारताची युवा तिरंदाज अदिती गोपीचंद स्वामीने नवा इतिहास निर्माण करताना मेडेलिन येथे सुरू असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 3 मध्ये महिलांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत नवा यू-18 विश्वविक्रम नोंदवला.
16 वर्षीय अदितीने 72 तीरांच्या पात्रता फेरीत 720 पैकी एकूण 711 गुण घेत अमेरिकेच्या लिको अॅरेओलाने गेल्या मेमध्ये नोंदवलेला 705 गुणांचा विश्वविक्रम मागे टाकत नवा विक्रम नोंदवला. वरिष्ठांमधील तिचा विश्वविक्रम मात्र थोडक्यात हुकला. सारा लोपेझच्या नावावर हा विक्रम असून तिने 713 गुण नोंदवले होते. ‘मी याची अपेक्षा केली नव्हती. अचूक तीर मारणे आणि जास्तीत गुण मिळविणे यावरच माझे जास्त लक्ष होते. पण आता विश्वविक्रम नेंदवल्याचा खूप आनंद झाला. कारण मी केवळ 16 वर्षांची आहे,’ असे वरिष्ठ स्तरावर पदार्पण करणारी अदिती या विश्वविक्रमानंतर म्हणाली.
भारताच्याच्या ज्योती सुरेखा व्हेन्नमने पात्रता फेरीत 708 गुण घेत दुसरे स्थान मिळविले तर परिणीत कौरने 700 गुणांसह सहावे स्थान मिळविले. भारतीय महिला कंपाऊंड संघातील ज्योती व्हेन्नम, अदिती गोपीचंद स्वामी व परिणीत कौर या तिघांनी मिळून एकूण 2119 गुण नोंदवले. कोरिया प्रजासत्ताकने नोंदवलेला 2120 गुणांचा विश्वविक्रम मात्र त्यांना मोडता आला नाही. गेल्या आठवड्यात सिंगापूर येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत कोरियाने हा विश्वविक्रम नोंदवला होता.
माजी वर्ल्ड चॅम्पियन अभिषेक शर्माने पुरुषांच्या पात्रता फेरीत 707 गुणांसह आठवे स्थान मिळविले. तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये तो यावर्षीच सहभागी झाला आहे. ओजस प्रवीण देवताळेने 703 गुणांसह 13 वे, प्रथमेश समाधान जावकरने 702 गुणांसह 28 वे स्थान मिळविले. सांघिक विभागात अभिषेक, ओजस, प्रथमेश या तिघांनी मिळून एकूण 2112 गुण नोंदवत दुसरे तर अमेरिकेने पहिले स्थान मिळविले. 13 जूनला ही स्पर्धा सुरू झाली असून 18 जूनला त्याची समाप्ती होणार आहे.









