सर्वांच्या नजरा भारतावर : लवकरच तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती ठरू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट 2023 च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तीन दिवसीय कार्यक्रमात सामील झाले. ही परिषद यापूर्वी 2021 मध्ये झाली होती, तेव्हा पूर्ण जग कोरोना महामारीच्या संकटात सापडले होते. तेव्हा कोरोनानंतरचे जग कसे असेल हे कुणीच जाणत हेते. परंतु आता जगात एक नवी जागतिक व्यवस्था आकार घेत असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
या बदलत्या जागतिक व्यवस्थेत पूर्ण जग भारताच्या दिशेने नव्या आकांक्षांनी पाहत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. जगाच्या पहिल्या तीन आर्थिक शक्तींमध्ये भारत सामील होण्याचा दिवस आता फार दूर राहिला नसल्याचे मोदी म्हणाले.
भारताची मेरीटाइम क्षमता
भारताची मेरीटाइम क्षमता मजबूत होत असल्याने देश तसेच जगाला याचा मोठा फायदा झाला आहे. याचमुळे आम्ही मागील 9 वर्षांपासून सातत्याने या क्षेत्राला मजबूत करण्याच्या योजनेवर काम करत आहोत. भारताने अलिकडेच एका पुढाकारावर उचललेले पाऊल 21 व्या शतकात जगभरातील मेरीटाइम क्षेत्र बदलू शकते. जी-20 परिषदेरम्यान भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरवर ऐतिहासिक सहमती झाली आहे. शेकडो वर्षांपूर्वी रेशीम मार्गाने जागतिक व्यापार वाढविला होता, तसेच तो जगातील अनेक देशांच्या विकासाचा आधार ठरला होता. आता हा नवा कॉरिडॉर देखील स्थानिक आणि जागतिक व्यापार-उद्योगाची प्रतिमा बदलणार असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड
आगामी दशकांमध्ये भारत जगातील आघाडीच्या 5 जहाजनिर्मात्या देशांपैकी एक होणार आहे. मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड हा आमचा मंत्र आहे. आगामी काळात आमच्या देशात अनेक ठिकाणी जहाजनिर्मिती आणि दुरुस्ती करणाऱ्या केंद्रांना विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे.
मेरीटाइम पर्यटनाला चालना
मेरीटाइम पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही जगातील सर्वात मोठी ‘रिव्हर क्रूज सेवा’ सुरू केली आहे. भारत स्वत:च्या वेगवेगळ्या बंदरांवर याच्याशी निगडित अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. बंदर संपर्कव्यवस्था मजबूत करण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटर लांबीचे नवे रस्ते तयार केले आहेत. सागरमाला प्रकल्पाद्वारे आम्ही किनारी क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांना मजबूत केले आहे. हे सर्व प्रयत्न लोकांना रोजगार मिळवून देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
व्हिजन 2047 सादर
पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमादरम्यान भारतीय मेरीटाइम ब्ल्यू इकॉनॉमीसाठी दीर्घकालीन ‘अमृत काळ व्हिजन 2047’ सादर पेले आहे. हा ब्ल्यूप्रिंट बंदर सुविधा वाढविणे, शाश्वत पद्धतींना चालना देणे, आंतरराष्ट्रीय सहकार्याला सुविधाजनक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी 23 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीच्या प्रकल्पांचे अनावरणही केले आहे.









