बेळगाव:
सीमालढ्याला बळकटी देऊन युवकांचे संघटन करण्यासाठी म. ए. समितीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. समितीची ताकद वाढविण्यासाठी युवकांची नवी फळी तयार होत आहे. म. ए. युवा समिती, सीमाभाग या नावाने ही संघटना कार्यरत राहणार असल्याचे युवा नेते शुभम शेळके यांनी सांगितले.
हिंडलगा येथे हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी हावळण्णाचे होते. समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके, कार्याध्यक्षपदी धनंजय पाटील, उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड झाली. उर्वरित पदे लवकरच भरली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तालुका आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बसवंत घाटेगस्ती, रामचंद्र कुद्रेमनीकर, संदीप मोरे, मयूर बसरीकट्टी, चंद्रकांत पाटील, यल्लाप्पा पाटील, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर व सदस्य उपस्थित होते.









