अंधश्रद्धेला फाटा देत ट्रॅक्टर मालकाचे धाडस
बेळगाव : अंधश्रद्धेला फाटा देत एका ट्रॅक्टर मालकाने नवीन ट्रॅक्टरची पूजा चक्क सदाशिवनगर स्मशानभूमीत केली. शुक्रवारी दलित नेते मल्लेश चौगुले व मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून पूजा झाली. शिवाय ट्रॅक्टर मालकाच्या हातात चावी सुपूर्द करण्यात आली. बाड (ता. हुक्केरी) येथील प्रकाश मैलकी यांनी महिंद्रा नोवो कंपनीचा नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आणि ट्रॅक्टर पूजेसाठी स्मशानभूमीत आणला. अंधश्रद्धेचा निषेध करीत नवीन पूजेचा पायंडा त्यांनी घातला. यापूर्वी आपल्या मुलाचे लग्नदेखील अमावास्येदिवशीच केले असल्याचेही त्यांनी सांगितले. अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे व पुरोगामी विचाराला बळकटी मिळावी यासाठी नवीन ट्रॅक्टरची पूजा स्मशानभूमीत केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









