कोल्हापूर :
तामिळनाडूच्या पोथाई मलाई पर्वतरांगांमध्ये ट्रॅप डोअर प्रजातीच्या कोळ्याचा नवा प्रकार शोधण्यात यश मिळाले आहे. या संशोधनात कोल्हापुरातील संशोधकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.
ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि विवेक वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली, अक्षय खांडेकर, स्वप्नील पवार आणि सतपाल गंगलमाले या तीन संशोधकांनी सहकार्य केले. नव्या प्रजातीला ‘हेलिगमोमेरस ऑस्ट्रेलिस’ असे शास्त्राrय नाव देण्यात आले असून, हे नाव या कोळ्याच्या दक्षिण भारतातील विशिष्ट अधिवासावर आधारित आहे. तामिळनाडूतील तिरूनेलवेली जिह्यातील पोथाई मलाई पर्वताच्या पायथ्याजवळ ही प्रजाती आढळली.
या संशोधनामुळे भारतातील दक्षिणेकडील गवताळ आणि जैवविविधतेने समृद्ध भागांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झाले आहे.
- ट्रॅप डोअर कोळी एक अद्भुत जीव
ट्रॅप डोअर कोळी हे जमीनीत खोल बिळं तयार करणारे कोळी आहेत. ते मिग्लोमॉरफि गटातील असून, टॅरंट्युला कोळ्यांच्या नातेवाईकांमध्ये गणले जातात. यांना “ट्रॅप डोअर“ असे नाव त्यांच्या खास दरवाजासारख्या बिळामुळे मिळाले आहे. हे कोळी मातीमध्ये खोल बिळं तयार करतात, त्यावर कुशलतेने दरवाजासारखे झाकण बसवतात. दरवाजा हा माती, रेशम आणि वनस्पतींच्या तुकड्यांपासून बनवलेला असतो. हा दरवाजा इतका चपळ आणि नैसर्गिक दिसतो की तो आजूबाजूच्या जमिनीत पूर्णपणे मिसळून जातो. हे कोळी दिवसभर बिळात लपून राहतात. रात्री किंवा भक्ष्य जवळ आल्यावर ते दरवाजा उघडून अचानक भक्ष्यावर झडप घालतात. त्यांच्या भक्ष्यात सामान्यत: लहान कीटक, अळ्या, इ. समाविष्ट असतात. शरीर जाडसर आणि केसाळ असते. रंग प्रामुख्याने तपकिरी, काळसर किंवा मातीच्या रंगासारखा असतो.यामुळे ते त्यांच्या परिसरात सहज मिसळून जातात. ट्रॅप डोअर कोळ्याच्या अनेक प्रजाती आहेत, आणि त्या जगभरात विविध उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय भागात आढळतात. भारतात देखील काही दुर्मिळ प्रजाती, विशेषत? दक्षिण भारतात, आढळतात. हे कोळी नैसर्गिक परिसंस्थेत कीटक नियंत्रण करण्यास मदत करतात.








