प्रशांत महासागरात 2.6 किमी खोलवर करते शिकार
न्यूझीलंडच्या वैज्ञानिकांनी शार्कची नवी प्रजाती शोधली आहे. नव्या प्रजातीचा हा शार्क मासा ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडच्या समुद्रात म्हणजेच प्रशांत महासागरात दिसून आला आहे. सध्या याला घोस्ट शार्कच्या प्रजातीत वर्ग करण्यात आले आहे. घोस्ट शार्क प्रशांत महासागराच्या तळात सुमारे दीड किलोमीटर खोलवर विहार करत असतात.
वेलिंग्टनच्या नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वॉटर अँड अॅटमॉस्फियरिक रिसर्चच्या वैज्ञानिकांनी घोस्ट शार्क अत्यंत काळोखयुक्त सागरी भागात शिकार करत असल्याचे सांगतले. वैज्ञानिक न्यूझीलंडच्या साउथ आयलँडपासून सुमारे 1 हजार किलोमीटर अंतरावरील चॅथम राइज भागात संशोधन करत असताना या माशाचा शोध लागला आहे. हा भाग प्रशांत महासागरात आहे.
याचे नाव सध्या ऑस्ट्रेलियन नॅरो-नोज्ड स्पूकफिश ठेवण्यात आले आहे. या घोस्ट शार्क म्हटले जातेय कारण हा शार्क आणि रे या दोन्हींची वैशिष्ट्यो दर्शवत आहे. याला चिमेरास देखील म्हटले जाते. या माशांची हाडं पूर्णपणे कार्टिलेजपासून निर्माण झालेली असतात.
स्पूकफिश सारख्या घोस्ट शार्कचे डोळे भीतीदायक असतात. अत्यंत काळे अन् गोल अशा स्वरुपाचे डोळे असतात. त्वचेवर सौम्य करड्या रंगाच्या स्केल्स असतात. हा मासा समुद्रात 2.60 किलोमीटर खोलवर असलेल्या क्रस्टेशियन जीवांना फस्त करतो. त्याचे तोंड टोकदार चोचीप्रमाणे असते.
घोस्ट शार्क समुद्राच्या तळाशी किंवा त्याच्या नजीकच असतो. हा मासा फारसा वर येत नाही असे वैज्ञानिक ब्रिट फिनुशी यांनी सांगितले. सध्या या प्रजातीचे नाव ब्रिट यांनी स्वत:च्या आजीच्या स्मरणार्थ हॅरिओट्टा एविया ठेवले आहे. त्यांनीच या नव्या शार्क माशाचा शोध लावला आहे.