निफ्टीत 133 अंकांनी वाढ : आयटीसी, रिलायन्सचे समभाग चमकले
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय शेअरबाजारात सध्या मोठ्या तेजीचा कल दिसत असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बाजार दमदार तेजीसोबत बंद झाला आहे. एवढंच नाही तर सेन्सेक्सने 65 हजाराचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. तसेच निफ्टी निर्देशांकानेही नवा उच्चांकी स्तर गाठला आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 486 अंकांच्या दमदार तेजीसह 65,205 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 133 अंकांनी वधारत 19,322 अंकांवर बंद झाला होता. अशाप्रकारे सेन्सेक्सने 65 हजाराचा महत्त्वाचा मोठा टप्पा पार केला आहे. एकाच दिवसात गुंदवणूकदारांची संपत्ती 1.82 लाख कोटींनी वाढलेली पाहायला मिळाली आहे. ऊर्जा, तेल आणि वायु, धातू, एफएमसीजी आणि वित्तसंबंधीत समभागांनी तेजीसोबत शेअरबाजाराला भक्कम आधार दिल्याचे पाहायला मिळाले. फार्मा, आयटी आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मात्र सोमवारी घसरणीसोबत बंद झाले होते. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.30 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.56 टक्के वाढीसह बंद झाला होता. सोमवारी बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1.82 लाख कोटी रुपयांनी वाढले होते. 30 जूनला 296.48 लाख कोटी रुपये इतके बाजार भांडवल राहिले होते. ते सोमवारी 298.30 लाख कोटी झाले आहे. निफ्टी बँकेचा निर्देशांक 429 अंकांच्या वाढीसह 45,176 अंकांवर बंद होताना दिसला.
सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग नफ्यासह बंद झाले होते. यात आयटीसीचे समभाग सर्वाधिक म्हणजेच 3.12 टक्के इतके वधारलेले होते. रिलायन्स इंडस्ट्रिज, बजाज फायनान्स, भारतीय स्टेट बँक व एचडीएफसी यांचे समभाग सर्वाधिक 1.77 ते 2.52 टक्के इतक्या प्रमाणात वधारलेले होते. अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, विप्रो, महिंद्रा आणि महिंद्रा, इंडसइंड बँक यांचे समभागसुद्धा तेजीसह बंद झाले होते. तर पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक 1.71 टक्के इतके नुकसानीत होते. यासोबत सन फार्मा, मारुती सुझुकी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टेक महिंद्रा यांचे समभागही घसरणीसह बंद झाले होते.
जागतिक बाजारात पाहता अमेरिका, युरोप व आशियाई अशा सर्वच बाजारात सोमवारी तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 285 अंकांनी तर नॅसडॅक 196 अंकांनी तेजीत होता. तर आशियाई बाजारात निक्की 564 अंकांनी, हँगसेंग 390 अंकांनी, कोस्पी 38 तसेच शांघाई कम्पोझीट 41 अंकांच्या तेजीसह कार्यरत होता.









