वृत्तसंस्था /बेंगळूर
येथ सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्या दिवशी सेनादलाचा धावपटू मनिकांताने पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. पुरुषांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत 21 वर्षीय मनिकांताने 10.23 सेकंदाचा अवधी घेत यापूर्वी म्हणजे 2016 साली ओडिशाच्या अमिया कुमार मलिकने नेंदवलेला 10.26 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. अलीकडेच हैदराबादमध्ये झालेल्या सेनादलाच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत मनिकांताने या क्रीडा प्रकारात 10.31 सेकंदाचा अवधी घेतला होता. 2020 साली मनिकांता भारतीय लष्करात दाखल झाला.
महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत पंजाबच्या कमलजित कौरने उपांत्य फेरीत 11.47 तर तामिळनाडूच्या गिरीधरनी रविकुमारने 11.46 तर कर्नाटकाच्या स्नेहाने 11.47 सेकंदाचा अवधी घेत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये रेल्वेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या तेजश्रीने उपांत्य फेरीत 13.72 सेकंदाचा अवधी घेतला. महिलांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत हिमाचल प्रदेशच्या सीमाने प्रथम स्थान मिळवले असून रेल्वेची कविता यादव दुसऱ्या तर उत्तर प्रदेशची फुलन पाल तिसऱ्या स्थानावर आहे. महिलांच्या हातोडा फेक प्रकारात पीएससीबीच्या अनमोल कौरने पहिले, उत्तरप्रदेशच्या तानिया चौधरीने दुसरे तर सरिता सिंगने तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या 10 हजार मी. धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या दिनेशने पहिले, एसएससीबीच्या मोहन सैनीने दुसरे तर संदीप सिंगने तिसरे स्थान मिळवले. पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये मध्यप्रदेशच्या देव मीनाने पहिले स्थान, शेखर पांडेने दुसरे तर तनुजकुमारने तिसरे स्थान मिळवले.









