रात्री 12 नंतर कार्यक्रम बंद : विजय सरदेसाई यांचा पुढाकार
पणजी : दिवाळीच्या पूर्व संध्येला अहोरात्र होणाऱ्या धागडधिंगाण्याला फातोर्ड्याचे आमदार व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी देखील आक्षेप घेतला असून फातोर्डामध्ये एक नवा पायंडा घालत त्यांनी रात्री बारानंतर कार्यक्रम बंद केला जाईल, अशी घोषणा केली आहे. एवढेच नव्हे तर नरकासुर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी लवकरात लवकर येणाऱ्या पहिल्या 10 पथकांना प्रत्येकी 15 हजार ऊपयांची विशेष पारितोषिके जाहीर केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि गोवा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करणार आहोत, असे सांगून गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी गोव्यातील अनेक स्पर्धा आयोजकांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फातोर्डामध्ये आपण श्रीकृष्ण विजय उत्सव हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करीत असतो. यंदा रात्री बारा वाजेपर्यंतच हा कार्यक्रम होईल.
रात्री आठ पर्यंत येणाऱ्या पहिल्या दहा पथकांना आपण प्रत्येकी पंधरा हजार ऊपयांची पारितोषिके देणार असल्याचे जाहीर केले. आम्ही जो कार्यक्रम आयोजित करतो त्यामध्ये कुठेही मध्यार्क वगैरे घेऊन कोणी माणसे येत नाहीत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आम्हाला नरकासुरला प्रोजेक्ट करायचे नाही तर भगवान श्रीकृष्णाचा संदेश पोहोचवायचा आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले. गोव्यातील अनेक भागात दिवाळीच्या पूर्वसंध्येला यंदा 19 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन केले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पूर्वसंख्येला विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. कार्यक्रमात वेळेचे बंधन राहत नाही. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून देखील त्यांचे सरळ सरळ उल्लंघन केले जाते. पोलिस यंत्रणा त्याकडे डोळेझाक करते. गेल्यावर्षी या गंभीर समस्येचे पडसाद सर्वत्र उमटले तसेच उच्च न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेऊन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिसांना देखील याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेली असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्याप कोणतीही कारवाई सुरू केलेली नाही किंवा या संदर्भात कोणत्याही सूचना जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील गोंधळ होण्याची शक्यता आहे. तथापि माजी उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांनी मात्र आपण आपल्या मतदारसंघात रात्री बारापर्यंतच कार्यक्रम होतील, त्यानंतर कार्यक्रम बंद केले जातील. स्पर्धा देखील सुरू राहिली तर ती बंद करावी लागेल. यासाठीच त्यांनी देखील गोव्यातील सर्व आयोजक संस्थांना रात्री बारा वाजता कार्यक्रम बंद करा, अशी विनंती केली आहे. आपल्यापासून इतरांना त्रास होऊ नये याची दखल घ्या आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी काळजी घ्या असेही आवाहन केले आहे.









