पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा मॉरिशस दौरा उभय राष्ट्रांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे. या दौऱ्यामुळे भारताच्या अत्यंत निकटच्या आणि विश्वासू मित्रामध्ये दृढ संबंधाची बैठक अधिक मजबूत झाली आहे. या बेट राष्ट्राच्या 57 व्या राष्ट्रीय दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हेते. मौल्यवान मित्राशी अर्थपूर्ण संवाद घडविणारा हा दौरा त्यामुळे समान इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा सुवर्णधागा जपणारा म्हणून नव्या सागर सिद्धांताची गुंफण करणारा ठरला आहे. दहा वर्षापूर्वी मांडलेला राजकीय सिद्धांत 2025 मध्ये प्रत्ययास आला. तो नव्या संदर्भात अधिक संयुक्तिक व अधिक औचित्यपूर्ण म्हटला पाहिजे.
महात्मा गांधींनी 10 मार्च रोजी दांडीयात्रेस प्रारंभ केला होता. तो दिवस मॉरिशसच्या स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रीय मुक्ती दिवस म्हणून निवडला आहे. सीवूसागुर रामगुलाम यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन वसाहती विरुद्ध स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते. अशा या पवित्र राष्ट्रीय दिनी भारतीय सशस्त्र दलाची एक तुकडी नौदल आणि हवाई दलासह या प्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होती. विकासाच्या सर्व पैलूंमधील ही भागीदारी उभय राष्ट्रांच्या मैत्री आणि सद्भावना वृद्धीसाठी प्रेरक व पोषक ठरणार आहे. इतिहास, भूगोल आणि संस्कृतीने हे दोन्ही देश प्राचीन काळापासून एकमेकांना जोडलेले आहेत. खोल परस्पर विश्वास आणि लोकशाही मूल्यांवरील समान श्रद्धा हा या संपर्काचा आत्मा आहे.
पंतप्रधानांच्या स्वागताला सेंट लुईस विमानतळावर 200 पेक्षा अधिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस या नात्याने मोदी यांनी 1998 मध्ये मॉरिशसला रामायण महोत्सवास संबोधित करण्यासाठी विशेष भेट दिली होती. पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर 2015 साली त्यांनी मॉरिशसला भेट दिली तेव्हा त्यांनी भारत-मॉरिशस सागरी सहकार्यासंदर्भात विशेष सिद्धांत मांडला होता.
समृद्ध, संपन्न इतिहास? – 1598 मध्ये
अॅडमिरल वायब्रँड व्हॅन वॉरविक यांच्या नेतृत्वाखाली दर्यावर्दी डच खलाशी ग्रँड पोर्टवर उतरले. तेव्हा त्यांनी आपल्या सम्राटाचे मॉरिशस हे नाव या बेटाला दिले व ते पुढे रूढ झाले. या बेट राष्ट्रावर राहणाऱ्या 12 लाख लोकसंख्येपैकी 70 टक्के लोक भारतीय समुदायाचे आहेत. मूलत: ब्रिटीश आणि फ्रेंच वसाहत असलेल्या या प्रदेशात भारतीयांनी दिलेले विकासात्मक योगदान सर्वात मोठे आणि भक्कम असे आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेत निवडून आलेल्या नेत्यांपैकी भारतीय नेत्यांनी आपले अष्टपैलू कर्तृत्व सिद्ध पेले आहे. दीर्घकाळ ब्रिटीशांच्या ताब्यात असलेले चागोस हे बंदर त्यांनी मॉरिशसला हस्तांतरीत करण्याचा निर्णय गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घेतला. त्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे हा दौरा म्हणजे मौल्यवान मित्रासोबत उपयुक्त संवाद साधण्याची मौलिक संधी असे म्हणता येईल. विविध क्षेत्रात सहकार्याचे नवनवीन मार्ग त्यामुळे शोधण्यात आले आहेत. हिंद महासागर क्षेत्रात सागरी संरक्षण सिद्धतेसाठी हा सिद्धांत वरदान ठरला आहे. 2015 मध्ये मांडलेल्या व्हिजन सागर सिद्धांताचा प्रत्यय 2025 मध्ये मूर्त स्वरुपात येत आहे. त्यामुळे या राज्यभेटीला विशेष महत्त्व आहे.
सहकार्याची विविध क्षेत्रे?- भारत-मॉरिशस दरम्यान सागरी सुरक्षा, आरोग्य सेवा, व्यापार या सर्व सहकार्याच्या विविध क्षेत्रात झालेले सामंजस्य करार एक नवे वळण देणारे आहेत. त्यामुळे या बेट राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी भारताकडून चालना मिळत आहे. विशेषत: संरक्षण क्षेत्र, आरोग्य सेवा, लघु व मध्यम उद्योग या क्षेत्रातील विकासाला नवी झेप घेण्यासाठी प्रेरक असे वातावरण भारत तयार करीत आहे ही बाब विशेषत्वाने नोंदविली पाहिजे. भारत आणि मॉरिशस दरम्यान आठ सामंजस्य करार झाले आहेत. त्याचा गोषवारा हा मोठा लक्षणीय आहे. पहिला करार आहे तो महासागर क्षेत्रातील शाश्वत विकासाबाबतचा. या कराराने पायाभूत विकासासाठी व्यापक चौकट प्रदान करण्यात आली आहे. सागरी संशोधन, मत्स्य व्यवसाय, हरित ऊर्जा, सागर तंत्रज्ञान संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, तज्ञांची देवाणघेवाण इत्यादी पैलूंचा समावेश आहे. दुसरा सामंजस्य करार सांस्कृतिक सौहार्दावर भर देणारा असून त्यामध्ये ललित कलांचे जतन, संवर्धन, सांस्कृतिक वारसा रक्षण, पर्यटन विकास, कला, परंपरांच्याविषयी प्रदर्शनांचे आयोजन आणि विद्यार्थी आदानप्रदान इत्यादी योजनांचा समावेश आहे. तिसरा करार कृषी आणि सहकार्य या क्षेत्रातील आदानप्रदानावर भर देतो. त्यामध्ये प्रामुख्याने मॉरिशसला आंब्याची आयात भारताकडून कशी सुलभ करता येईल याचा विचार करण्यात आला आहे. चौथा करार अगालेगा या बंदराच्या विकासाचा असून त्यामध्ये तेथे हवाई व सागरी वाहतूक सुरक्षित करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यात येणार आहेत. पाचवा करार हा पारंपरिक आणि होमिओपॅथी औषधांच्या आदानप्रदानावर भर देणारा आहे. त्यामुळे उभय राष्ट्रातील पारंपरिक उपचार पद्धतींचा विकास होईल आणि आयुष मंत्रालयाकडून निर्माण केल्या जाणाऱ्या विविध आयुर्वेद उत्पादनांचा पुरवठा मॉरिशसमध्ये करण्यात येईल. अशा प्रकारचे हे सामंजस्य करार निश्चितच संबंधाला अधिक रचनात्मक दिशा देणारे आहेत.
सर्वोच्च सन्मान?- मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित केला. हा सन्मान मिळविणारे मोदी हे भारताचे आतापर्यंतचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. याचा अर्थ असा होतो की, मॉरिशसला पंतप्रधानांच्या अष्टपैलू नेतृत्वाची व त्यांनी घडविलेल्या राष्ट्रीय विकासातील मौलिक योगदानाची खात्री पटली आहे व त्यांनी त्याबद्दलची पावती दिली आहे. मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन प्रदान करण्याची घोषणा केली. भारत-मॉरिशस संबंध मजबूत करण्यात मोदी यांच्या योगदानाचा हा सन्मान आहे. आतापर्यंत जगातील चार नेत्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मोदी हे त्या मालिकेत पाचवे आहेत आणि भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. अध्यक्ष धरमबीर गोखूल यांना मोदी यांनी महाकुंभातील पवित्र संगमाचे पाणी पितळ आणि तांब्याच्या भांड्यात भेट दिले. अध्यक्ष महोदयांच्या पत्नीस बनारसी रेशमी साडीही भेट देण्यात आली. तेथील वनस्पती उद्यानात पूर्व राष्ट्रपती सीवूसागुर रामगुलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. तेव्हा मोदी यांनी हरित आणि उज्वल भविष्यासाठी प्रतिक म्हणून या वृक्षाकडे पाहण्याचे आवाहन केले. मैत्रीचा हा वृक्ष आमच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिक म्हणून उंच उंच उभा आहे असेही त्यांनी त्याचे वर्णन केले. मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यानंतर केलेल्या भाषणात मोदी यांनी उभय राष्ट्रातील संबंधांचे, सहकार्याचे आणि नवनव्या क्षेत्रातील योगदानाचे ठोस चिंतन केले. आपल्या भाषणात त्यांनी असे सूत्र मांडले की, भारत आणि मॉरिशसमधील संबंध हे केवळ हिंद महासागरापुरतेच नव्हेत तर आपल्या सामायिक संस्कृती, इतिहास आणि मूल्यांवर आधारलेले आहेत. आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या प्रवासात आपण भागीदार आहोत. नैसर्गिक आपत्ती असो की, कोविडसारखे संकट असो यावेळी दोन्ही देशांनी परस्परांना मदतीचा हात दिला, सहकार्य केले. आता शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटी अशा अनेक नव्या क्षेत्रात विकासाचे महापर्व सुरू आहे. मेट्रो ट्रेन असो, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन असो की, बेट राष्ट्रातील कनेक्टिव्हिटी आणि यूपीआय पेमेंट सुविधा असो या सर्व बाबतीत भारत थोरला भाऊ म्हणून मदतीसाठी नेहमीच हात पुढे करीत आहे.
मौलिक असा दस्तऐवज?- मॉरिशसमधील भारतीय समुदायासमोर मोदी यांनी केलेले भाषण म्हणजे उभय राष्ट्राच्या मैत्रीतील एक मौलिक दस्तऐवज आहे. मॉरिशसच्या लोकसंख्येपैकी 70 टक्के भारतीय आहेत व त्यामध्येही उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील भोजपुरी समुदायातील लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मोदी यांनी आपले भाषण हिंदी आणि भोजपुरी असे मिश्र भाषेमध्ये केले. भोजपुरी भाषेतील त्यांनी केलेल्या आव्हानामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा व वत्तृत्वाचा मोठा ठसा उमटला. आमच्यादृष्टीने मॉरिशस हे एक कुटुंब आहे, अशी सुरूवात करून त्यांनी आपल्या भाषणाला क्रमाक्रमाने यशशिखरावर नेले. मॉरिशस हे आमच्यासाठी केवळ एक भागीदार राष्ट्र नाही तर ते आमच्यासाठी एक कुटुंब आहे. हे बंध इतिहास, वारसा आणि मानवी आत्म्यात रूजलेले आहेत. नवीन भारतासाठी जागतिक दक्षिणेला जोडणारा मॉरिशस हा एक महान पूल आहे. हे नाते भारताच्या सागर दृष्टीकोनामुळे अधिक मजबूत झाले आहे. दशकापूर्वी जाहीर केलेल्या सागर दृष्टीकोनाच्या मॉरिशस केंद्रस्थानी आले आहे. आम्ही जे स्वप्न पाहिले ते खरे करून दाखविले असे मोदी यांना म्हणावयाचे आहे.
आर्थिक विकासात मॉरिशसचा सहभाग महत्त्वाचा आहे. तुम्ही लोक इथे येता तेव्हा तुम्ही आपला देशही समृद्ध करीत असता असे सूत्र मांडून मोदी यांनी प्रवासी भारतीयांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. मॉरिशसमध्ये अधिकाधिक लोकांनी गुंतवणूक करावी म्हणून त्यांना प्रोत्साहित करण्यावर मोदी यांचा भर होता. व्यवसाय करणे सोपे करण्यासाठी नोकरशाहीचे प्राबल्य टाळणे आणि लाल फितीचा प्रभाव कमी करणे महत्त्वाचे आहे असे नमूद केले. अनिवासी भारतीयांपुढे मोदी यांनी केलेले 30 मिनिटांचे भाषण मॉरिशस आणि भारत यामधील मातीचे नाते, हृदयाचे नाते व रक्ताचे नाते स्पष्ट करणारे ठरले. त्यांनी भोजपुरी भाषेत आपल्या भाषणाचा प्रारंभ केला आणि रामायणापासून ते बिहारमधील मखाना या खाद्यपदार्थापर्यंत अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आणि उभय देशातील सांस्कृतिक बंध मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांचे हे भाषण लोकभाषा, लोकसंस्कृती आणि लोकसंवाद यांच्या आधारे मॉरिशसमधील लोकांच्या हृदयाच्या तारा छेडणारे ठरले असे म्हणावे लागेल.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर








