पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : जगभरात क्रीडा क्षेत्रातही भारत नंबर वन बनणार,37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
मडगाव : देशात 2014 नंतरच खऱ्या अर्थाने खेळ बहरू लागले. यापूर्वी खेळाला विशेष महत्त्व दिले जात नव्हते. 2014 नंतर खेळाचे बजेट वाढविण्यात आले. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम देशात प्रथमच झाले. त्याची फलश्रुती आता दिसून येत आहे. हल्लीच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धात आपल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना 100 हून अधिक पदके पटकावली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल गुऊवारी फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दिन, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात गोव्याची विंड सर्फर कात्या कुएल्हो हिने राष्ट्रीय क्रीडास्पर्धेची मशाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मोदींच्या हस्ते ज्योत प्रज्वलित झाल्यावर राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘खेलो इंडिया’ क्रीडापटूंना नवे व्यासपीठ
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खेलो इंडियाच्या माध्यमातून युवा खेळाडूंना व्यासपीठ उलपब्ध करण्यात आलेले आहे. नवीन क्रीडामैदाने उलपब्ध करण्यात आलेली आहेत. खेळाडूंना अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. आज देश क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू लागलाय. खेळाडू जुने रेकॉर्ड तोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करू लागले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अडथळे दूर करून खेळाडूंना ऑलिंपिकच्या दारापर्यंत पोहोचवले आहे. देश आगामी काळात ऑलिंपिकच्या स्पर्धा घेण्यास सक्षम झालेला असेल.
प्रत्येक खेळाडूला सहा लाख ऊपयांपर्यंत शिष्यवृत्ती
आपल्या 27 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी खेळ तसेच देशाच्या वाटचालीचा आढावा घेतला. खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक खेळाडूला सहा लाख ऊपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे सांगितले. आशियाई स्पर्धेत खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. तसेच इतर स्पर्धांत सुद्धा खेळाडूंनी पदके प्राप्त करीत असल्याचे सांगितले.गेल्या 30 दिवसांत वाराणसीमध्ये आधुनिक क्रिकेट स्टेडियमच्या कामाला प्रारंभ झालेला आहे. तसेच ग्वाल्हेरमध्ये अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. गोव्यात होत असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत नव्या विक्रमांची नोंद खेळाडू करतील. यातून देशाला नवीन खेळाडू भेटतील. या खेळांडूकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली असून या स्पर्धां यशस्वी होतील, असेही पंतप्रधान म्हणाले. तसेच गोव्यात झालेल्या कार्यक्रमांबद्दलही त्यांनी कौतुक केले. जी 20, ब्रिक्स, गोव्याचे पर्यटन मॉडेल रोड मॅप ठरणार असून गोव्यात आयोजित केला जाणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता जगभरात पोहोचला असल्याचे मोदी म्हणाले.
‘माझा भारत’ अभियान…
31 ऑक्टोबर रोजी ‘माझा भारत’ अभियानचा शुभारंभ देशभरात होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या अभियानात गोव्यासहीत देशातील अन्य भागातील युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा
गोव्याला केंद्र सरकारचा पाठिंबा मिळत असल्याने आज राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. त्याचबरोबर मांडवी व जुवारी नदीवर नवीन पूल, धारगळ येथे आयुष्य हॉस्पिटल, कुंकळळी एनआयटी शिक्षण संस्था, मोपा विमानतळ, रस्त्याचे ऊंदीकरण होत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आपल्या भाषणात म्हणाले. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या चेअरमन पी. टी. उषा यांनी सर्वांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्या म्हणाल्या की, भारतीय ऑलिंपिक संघटना विविध खेळ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या अपेक्षा ठेऊन आहेत. त्यांच्या अपेक्षांना पात्र ठरण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
ढिसाळ उद्घाटन सोहळा…
मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र, हे आयोजन ढिसाळ निघाले. आयोजकांनी प्रत्येक खुर्चीवर शिट्टी ठेवली होती. या शिट्ट्या घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी नुसता गोंधळ घातला. संपूर्ण मैदानात सातत्याने शिट्ट्या वाजू लागल्याने वक्ते काय बोलतात हे देखील लोकांना ऐकू जात नव्हते. गायक कलाकार कोणती गाणी सादर करत आहेत हे सुद्धा ऐकू येत नव्हते. त्यात भर म्हणून ध्वनी योजना (साऊंड सिस्टम) एकदम खराब निघाली. अवघेच स्पीकर चालत होते. तर उर्वरित स्पीकर बंदच होते. ते शेवटपर्यंत दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे कार्यक्रमाचा देखील बेरंग झाला.
पत्रकार कक्ष… नको रे देवा…
या उद्घाटन सोहळ्याचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना स्टेडियमच्या एका कोपऱ्यात पत्रकार कक्ष देण्यात आला होता. त्या ठिकाणी फक्त शालेय विद्यार्थ्यांचा गोंधळ ऐकू जात होता. त्यात उन्हाचा मारा देखील पत्रकारांना सहन करावा लागला. पत्रकार कक्षात पाण्याची सोय देखील नव्हती. पत्रकारांना कार्यक्रमाचे फोटो देखील घेणे कठीण जात होते. मुख्य कार्यक्रमाचे व्यासपीठ एका बाजूला व पत्रकार दुसऱ्या टोकाला अशी स्थिती होती.









