वृत्तसंस्था /चेन्नई
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज टी नटराजनने त्याच्या गावात स्वत:चे क्रिकेट स्टेडियम बांधले आहे. आपल्या गावात लहान मुले आणि युवा खेळाडूंसाठी मैदान बनवण्याचे नटराजन आणि त्याच्या प्रशिक्षकाचे स्वप्न होते. आता नटराजनने स्वत:चे आणि प्रशिक्षकाचे हे स्वप्न साकार केले आहे. दोनच दिवसापूर्वी म्हणजेच 23 जून रोजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले. नटराजनने गतवर्षी आपल्या गावात क्रिकेट अकादमी सुरू करण्याची घोषणा केली होती. तमिळनाडूतील सालेम जिह्यातील चिनप्पापट्टी हे त्याचे गाव आहे. भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने गावातील तरुण खेळाडूंना याचा फायदा व्हावा म्हणून हे मैदान बनवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, 23 जून रोजी या मैदानाचे थाटात उद्घाटन करण्यात आले.नटराजन क्रिकेट क्लब नावाने सुरु झालेल्या या मैदानावर चार खेळपट्टी असतील. तसेच कॅन्टीन व 100 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या मैदानावर केली गेली आहे. या उद्घाटन सोहळ्याला दिनेश कार्तिकसह वॉशिंग्टन सुंदर व साई किशोर हे तमिळनाडूचे क्रिकेटपटू हजर होते. याशिवाय, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पी. सिगामणी व प्रसिद्ध अभिनेता योगी बाबू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, साई किशोरने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. डिसेंबर 2020 मध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात 3-3 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. मार्च 2021 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तो दोन वर्षांहून अधिक काळ संघाबाहेर आहे.









