दोन्ही गटांकडून प्रस्ताव सादर, निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई / प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ या नावासह ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवण्याचा अस्थायी निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची धावपळ सुरू झाली आहे. रविवारी दिवसभर वेगवेगळय़ा तज्ञांशी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही गटांनी पक्षाचे नवे नाव आणि चिन्हांसंबंधी वेगवेगळे प्रस्ताव निवडणूक आयोगाला सादर केल्याचे समजते. आता दोन्ही गटांना वेगवेगळे नवे नाव आणि चिन्ह ठरवून देताना तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून निवडणूक आयोगासमोर नवा पेच निर्माण हेऊ शकतो.
आपल्याकडून तीन चिन्ह आणि तीन नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे देण्यात आला असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी दिली. तसेच एकनाथ शिंदे गटानेही जोरदार मोर्चेबांधणी करत आपला प्रस्ताव तयार केला आहे. दोन्ही प्रस्तावांवर निवडणूक आयोग सोमवारीच विचार करून महत्त्वाचा निर्णय जारी करू शकतो. अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने आता आयोगाला तातडीने यासंबंधी निर्णय घ्यावा लागणार आहे.
निवडणूक आयोगासमोर पेच
उद्धव ठाकरे यांनी तीन नावे निवडणूक आयोगापुढे सादर केली आहेत. तर एकनाथ शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला दोन नावांचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. यातील एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे असल्याची माहिती सूत्रांनी दिले. त्यामुळे आता गटाला नावे देताना निवडणूक आयोगासमोर नवा पेच निर्माण होणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून चिन्हाबाबत कोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबाबत गुप्तता पाळली आहे.









