चिपळूण :
‘हायटेक’च्या धर्तीवर बांधण्यात येत असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास जात नसताना अशातच रखडलेल्या उर्वरित कामासाठी तिसऱ्या नव्या ठेकेदाराची एसटी महामंडळाने नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे बसस्थानकाच्या एका इमारतीसाठी आतापर्यंत दोन ठेकेदार बदलण्यात आले आहेत. नव्या ठेकेदाराला उर्वरित कामाची वर्कऑर्डर काही दिवसापूर्वीच देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष बांधकाम सुरु कधी होणार, असा खोचक प्रश्न प्रवाशांतून पुढे येत आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने सोयीसुविधांयुक्त ‘हायटेक’च्या धर्तीवर बसस्थानक बांधण्यास काही वर्षापूर्वी प्रारंभझाला. काही दिवस जाता त्यावेळचा ठेकेदार व एसटी महामंडळ यांच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला. परिणामी कित्येक वर्ष होऊनही बसस्थानकाचे बांधकाम रखडलेल्या स्थितीत होते. असे असताना हे बसस्थानक पूर्णत्वास जावे, यासाठीची ओरड प्रवाशांतून होवू लागल्यानंतर अखेर जाग आलेल्या एसटी महामंडळाने पूर्वीच्या ठेकेदाराचा ठेकादाराकडून त्या जागी नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. नव्या ठेकेदाराने रखडलेले बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी कमालीची गती घेत बसस्थानक इमारतीचा रखडलेला पाया खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पूर्णत्वास नेला. त्या पाठोपाठ इमारतीसाठीचे पिलर त्यानंतर पहिल्या मजल्याचा स्लॅब इथपर्यंतची कामे पूर्णत्वास गेली. असे असताना कित्येक वर्षे रखडलेली कामे पूर्णत्वास जात असताना बसस्थानकप्रश्नी एसटी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. त्यानंतर कित्येक वर्षे चर्चेत असलेली बसस्थानकाची इमारत पूर्णत्वास जावी, अशी अपेक्षा वर्तवली जात असतानाच अशात याही ठेकेदारामुळे उर्वरित कामे अनेक महिने रखडली. बसस्थानक इमारत पूर्णत्वास जात नसल्याकारणाने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. असे असताना या रखडलेल्या बसस्थानकात स्थानिक आगार प्रशासनाने नवी शक्कल लढवत प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था केली आहे. यातून प्रवाशांना एकप्रकारे दिलासा मिळत आहे.
अनेक महिने ठेकेदारामुळे रखडलेल्या बसस्थानकाचे बांधकाम पूर्णत्वास जावे, यासाठी एसटी महामंडळाने २ कोटी ८७ लाखाच्या कामासाठी चिपळुणातीलच एका ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. त्या कामासंदर्भात त्या ठेकेदारास वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. असे असताना बसस्थानकाच्या एका इमारतीसाठी आतापर्यंत दोन ठेकेदारानंतर तिसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याही ठेकेदाराकडून बसस्थानक इमारत पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.








