कराड :
कराड शहर व आशियाई महामार्गाला जोडणाऱ्या ब्रिटीशकालीन जुन्या कोयना पुलाच्या जागेवर आता चार पदरी नवीन प्रशस्त पुल होणार आहे. यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी फंडातून 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन पुलामुळे कोल्हापूर नाक्यासह येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने कराडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सन 1871 च्या सुमारास स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिशांनी जुन्या कोयना पुलाची उभारणी करण्यात आली. कराड शहराला विविध बाजूंनी जोडणारा दुवा म्हणून या पुलाची ओळख आहे. कराड परिसरातील सर्वात पहिला लोखंडी व दगडी बांधकाम असणारा हा पूल कमानी स्वरुपाचा असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. नदी पात्रातील बांधकामदेखील दगडी असून, वरील सर्व भाग लोखंडी आहे. मात्र तब्बल 154 वर्षे पूर्ण झाल्याने हा पूल कमकुवत बनला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून या पुलावरील अवजड वाहतूक बंद आहे. मधल्या काळात पुलाची काही प्रमाणात दुरूस्ती केल्यानंतर पुलावरून हलकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप पुलाचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. हा पूल अत्यंत अरुंद असल्याने या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी जाणवते. तसेच महामार्गावरील पुलाचे काम सुरु असल्याने नव्या कोयना पुलावर आणि कोल्हापूर नाक्यावरही मोठी वाहतूक कोंडी होते. याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
जुन्या कोयना पुलावर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी व भविष्यातील वाहतुकीचा विचार करून आमदार डॉ. अतुल भोसले यांनी या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी पाठपुरावा केला. या प्रश्नी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करुन वस्तुस्थितीची माहिती दिली व नवीन पूल मंजूर करण्याची मागणी केली.
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीची दखल घेत येथे नवीन चारपदरी पुलाची उभारणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) अंतर्गत तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नव्या पुलाच्या उभारणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपा–महायुती सरकारचे आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे कराडकरांमधून अभिनंदन होत आहे.








