पाऊस पडू नये अशीच लोकांची प्रार्थना
निसर्गाने स्वत:च्या गर्भात अनेक रहस्यं दडवून ठेवली आहेत. अनेकदा तर आम्ही आरामात जगत असतो आणि कुठला धोका आमच्या दिशेने येत आहे हेच आम्हाला ठाऊक नसते. काही असाच प्रकार ब्राझीलियन अमेझॉनमध्ये असलेल्या एका शहरासोबत घडत आहे. या शहरात 55 हजार लोकांचे वास्तव्य आहे. आपल्यासोबत असे घडेल याची किंचित कल्पनाही त्यांनी केली नव्हती. कुणी वसविलेले सुंदर शहर अचानक नष्ट व्हावे अशी इच्छा कुणाची असू शकते? परंतु निसर्ग अन् नियतिसमोर कुणाचेच चालत नाही. ब्राझीलियन शहर सध्या रहस्यमय दैत्याकार खड्ड्यांच्या तावडीत सापडले आहे.
हे खड्डे या शहराला गिळू पाहत आहेत. बुरीटिकुपू नावाच्या या शहरात सध्या खळबळ उडाली आहे, कारण या शहराला 26 विशाल आकाराच्या खड्ड्यांनी चहुबाजूने घेरले आहे. बुरीटिकुपू नावाच्या शहरात मोठमोठ्या खड्ड्यांची समस्या मागील 30 वर्षापासून चालत आली आहे. हे खड्डे येथील बलुई माती अन् खराब नियोजनासह जंगलतोड करण्यात आल्याने निर्माण झाले आहेत. शहराला सर्व बाजूने सुमारे 26 मोठ्या अन् खोल खड्ड्यांनी घेरले असल्याचा इशारा तज्ञांनी काही वर्षांपूर्वीच दिला होता. आता हे खड्डे शहराच्या दिशेने वाढत आहेत.
अलिकडेच पाऊस पडल्यावर या खड्ड्यांचा आकार अधिकच विशाल झाला. मागील काही महिन्यांमध्ये शहरांच्या दिशेने वाढणाऱ्या या खड्ड्यांमुळे समस्या निर्माण झाली आहे, कारण 50 घरांना या खड्डयांनी गिळकृंत केले आहे. हा प्रकार अत्यंत भीतीदायक आहे आणि आम्ही केवळ पाऊस पडू नये अशी प्रार्थना देवाकडे करतो. पाऊस पडू लागताच आम्ही घाबरून जातो आणि जमीन खचल्याचा आवाज कानावर पडू लागतो. आतापर्यंत या ठिकाणावरून सुमारे 12 हजार लोकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. काही रस्तेही खचले आहेत आणि आता हा विषय स्थानिक प्रशासनाच्या हातून निसटला आहे. येथून दुसरीकडे गेल्यावर डोक्यावर छत कुठून आणणार असा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.









