संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : गोव्यातील सागरी परिषदेत संरक्षणमंत्र्यांचे मार्गदर्शन,बांगलादेश, सिंगापूरसह अकरा राष्ट्रांचा सहभाग
पणजी : हवामान बदल, चाचेगिरी, दहशतवाद, अमलीपदार्थांची तस्करी, अनिर्बंध मासेमारी आणि सागरी वाणिज्यस्वातंत्र्य यासारख्या सामायिक सागरी आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी हिंद महासागर क्षेत्रात बहुराष्ट्रीय सहयोग चौकट स्थापन करा, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भारतीय नौदलातर्फे दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेत (एनआयओ) काल सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या सागरी परिषदेत संरक्षणमंत्री बोलत होते. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्याबरोबरच संरक्षण प्रभारी प्रतिनिधी, कोमोरोस मोहम्मद अली युसुफ आणि हिंद महासागरातील अन्य अकरा राष्ट्रांचे वरिष्ठ प्रतिनिधी, नौदलाचे प्रमुख, सागरी दलांचे प्रमुख उपस्थित होते. या परिषदेत बांगलादेश, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
समुद्री कायद्यांचा आदर व्हावा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, सागरी प्रदेशाची सुरक्षा, समृद्धी कमी करण्यासारखे स्वार्थी हितसंबंध टाळून सर्वांचे सहकार्य असले पाहिजे. तसेच यूएनसीएलओएस म्हणजेच ‘युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ – 1982 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचा आदर करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
प्रतिबद्धतेचे नियम महत्त्वाचे
‘माझे तेच बरोबर’ या मताने काम करण्याला सागरी क्षेत्रात स्थान नाही. आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचे पालन करणे हेच आपल्यासाठी ध्रुवताऱ्यासारखे मार्गदर्शक असले पाहिजे. आपले संकुचित तात्कालिक हितसंबंध आपल्याला सुस्थापित आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन किंवा दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करू शकतात, परंतु असे केल्याने आपले सुसंस्कृत सागरी संबंध तुटतील, असेही ते म्हणाले. हवामान बदलाविषयी सहयोगात्मक चौकटीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वत पद्धतींचा स्वीकार करण्यासाठी देशांनी एकत्रित येऊन काम करता येईल, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. हरित अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याची जबाबदारी सर्व देशांनी स्वीकारली आणि गरजू देशांसोबत तंत्रज्ञान आणि भांडवल सामायिक केले तर जग या समस्येवर मात करू शकेल, असे त्यांनी सांगून त्यावर जोर द्यावा, असे आवाहन केले. 12 देशांच्या भेटी देणाऱ्या मान्यवरांना अत्याधुनिक शस्त्रs, उपकरणे आणि इतर बाबींमध्ये स्वदेशी उत्पादनात भारताच्या संरक्षण उद्योगाच्या वाढत्या क्षमतेची झलक दाखवण्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ’मेक इन इंडिया’ स्टॉल्सना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भेट दिली.
बेकायदेशीर मासेमारी रोखा
राजनाथ सिंह यांनी संसाधनांच्या बेसुमार वापराचे आव्हान असलेल्या बेकायदेशीर, नोंद नसलेल्या आणि नियमन नसलेल्या (आययुयु) मासेमारीचा संदर्भ दिला. अशाप्रकारची मासेमारी सागरी परिसंस्था आणि शाश्वत मत्स्यपालन धोक्यात आणते. यामुळे आपली आर्थिक सुरक्षा आणि प्रादेशिक आणि जागतिक अन्न सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. बेकायदेशीर अतिमासेमारी रोखण्यासाठी देखरेख डेटाचे संकलन करावे. यासाठी बहुराष्ट्रीय सहयोगी प्रयत्न होणे, ही काळाची गरज आहे, असेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करा : लेखी
सहकार्याला चालना देणारे उपाय शोधणे, विश्वास निर्माण करणे आणि जोखीम कमी करणे हे आव्हान आहे. आम्ही जीएमसी, संयुक्त सराव, औद्योगिक सहयोग, संसाधनांची देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे इत्यादीद्वारे विश्वास निर्माण करतो. त्यामुळे हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करा, असे आवाहन परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी केले.
सागरी धोक्यांबाबत सजग रहा : कुमार
नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी पारंपरिक व अपारंपरिक सागरी धोक्यांच्या बदलत्या स्वरूपावर माहिती देताना याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. तसेच हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा, सामायिक सागरी प्राधान्यांना सहयोगी निवारण आराखड्यात रूपांतरित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.









