मंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा : बांदोडकर मैदानावर अतिरिक्त वॉकिंग ट्रॅकचे उद्घाटन
वार्ताहर /मडकई
स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानात बांधण्यात आलेल्या अतिरिक्त वॉकिंग ट्रॅकच्या आजच्या उद्घाटनाबरोबर येत्या डिसेंबर महिन्यात मडकईतील बहुउद्देशीय सभागृह मैदानाचे उद्घाटन करण्यात येईल. रु. 3 कोटी खर्चून मडकईचे बहुउद्देशीय मैदान उभारण्यात आले आहे. त्यात विविध सुविधा आहेत. बांदोडकर मैदानासारखा मडकईतील मैदानाचा लाभ ज्येष्ठ नागरिक, युवक युवती व क्रीडापटूंना होईल, असा विश्वास वीजमंत्री व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला. बांदोडा येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानात नागरिकांच्या मागणीनुसार बांधण्यात आलेल्या अतिरिक्त वॉकिंग टॅकचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री ढवळीकर बोलत हेते. सन् 1978 पासून काशिमठ मैदानाचा ताबा बांदोडा पंचायतीकडे होता. मात्र पंचायतीकडे विकासकामांचे नियोजन करण्यासाठी पर्याय नसल्याने त्यांना फोंडा गटविकास कार्यालयातील अभियंत्याकडे जावे लागत होते. क्रीडा क्षेत्र आणि ज्येष्ठ नागरिक यांची सोय लक्षात घेऊन सन 2004 साली हे मैदान पंचायतीकडून बांधकाम खात्याच्या ताब्यात घेऊन मैदानाचा विकास बांधकाममंत्री असताना घडवून आणला होता. अनेक अडथळ्यांवर मात करीत मैदानाचा प्रकल्प मार्गी लावला. सायंकाळच्या निवांतवेळी ज्येष्ठ नागरिकांना बसून वेळ घालविण्यासाठी तसेच वाढत्या गर्दीमुळे बांधलेला वॉकिंग ट्रॅक नागरिकांना अपुरा पडत असल्याने अतिरिक्त टॅकची सोय करण्यात आली. याचे श्रेय नागरिकांबरोबर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना देत असल्याचे मंत्री ढवळीकर म्हणाले. यावेळी बांदोडा पंचायतीचे सरपंच सुखानंद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, कुर्टीच्या जिल्हा पंचायत सदस्य प्रिया च्यारी, दामोदर नाईक, कार्यकारी अभियंते शशिकांत देसाई, साहाय्यक अभियंते अरविंद फडते, रामचंद्र नाईक आदी व्यासपीठावर उपस्थीत होते.
फोंडा पालिका निवडणुकीमुळे भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामात खंड
पीपल ऑफ फोंडा या संस्थेने फोंड्यातील रस्त्याच्या खोदकामासंदर्भात केलेले भाष्य चुकीचे असल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. प्रत्यक्षात फोंड्यात दीड महिन्यांपूर्वी उच्च व कमी दाबाच्या वाहिन्या भूमिगत करण्यासाठी सुरुवात केली होती. मात्र फोंडा पालिका निवडणुकीमुळे हे काम स्थगित ठेवावे लागले. सन् 1963 पासून पथदीपावरुन गेलेल्या या वाहिन्या कधीच बदलल्या नव्हत्या. 40 वर्षानंतर मंत्री नीलेश काब्राल यांनी वीजमंत्री असताना या वाहिन्या भूमिगत करण्याचे निश्चित केले. त्याची पुढील प्रक्रिया म्हणून ही कामे हाता घेण्यात आली आहेत.
मंत्री सुदिन ढवळीकर यांचे अभिनंदन : नीलेश काब्राल
फोंडा तालुक्यात भूमिगत वीजवाहिन्यांचे काम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी हाती घेतले आहे. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी ही योजना राबवली आहे. रस्ता खोदल्यामुळे वर्षभरासाठी नागरिकांना त्रास सोसावे लागेल, याची कल्पना सरकारला आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर चांगली सोयही होणार आहे. रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाच्या निविदा निघालेल्या आहेत. पावसाळ्यात रस्ते हॉटमिक्स करणे शक्य नाही. मात्र जी कामे केली जातील त्यातून मंत्री सुदिन ढवळीकर जनतेचे भलेच करणार आहे. अशा कामांसाठी आपण मंत्री ढवळीकरांचे कौतुक करुन त्यांचे अभिनंदन करीत असल्याचे मंत्री काब्राल म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक श्री. खांडेपारकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सलोनी गावडे यांनी केले, तर चित्रा फडते यांनी आभार मानले.