या जगात विस्मयकारक स्थानांची कोणतीही कमतरता नाही. पूर्वीच्या काळी या स्थानांची शास्त्रीय माहिती लोकांना नव्हती. त्यामुळे या स्थानी घडणाऱया घटना ‘चमत्कार’ म्हणून ओळखल्या जात असत. कालांतराने वैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून या घटनांमागची शास्त्रीय कारणे कळली. त्यामुळे त्यांचे चमत्कार मूल्य नाहीसे झाले असले तरी त्यांचे आकर्षण काही कमी होत नाही.
मध्य आशियातील अझरबैजान या देशात असेच एक स्थान आहे. हा एक डोंगर असून तो हजारो वर्षांपासून सातत्याने ‘जळत’ आहे. थंडी असो, पाऊस असो किंवा हिमवर्षाव होत असो, नेहमी त्यावर आग पेटलेली असते. या आगीचे शास्त्रीय कारण माहीत नव्हते, तेव्हा ही आग ‘सैताना’ची आहे, असे म्हटले जात असे. आता या आगीचे कारण समजले आहे पण तरीही हा डेंगर पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. या देशात अशी अनेक स्थाने आहेत, जिथे अपोआप आग लागत असते. पण या डोंगराचे वैशिष्टय़ असे की तो सतत जळत असतो. स्थानिक भाषेत याला यनार डाग असे म्हणतात. याचा अर्थ जळणारा पहाड असाच आहे. हा डोगंर गेली चार हजार वर्षे जळत आहे, अशी माहिती दिली जाते. या आगीचे कारण गेल्या 20 वर्षांमध्ये ज्ञात झाले आहे. या डोंगराची निर्मिती काही ज्वालाग्रही रसायनांपासून झाली आहे. किरकोळ कारणास्तवही ही रसायने काही काळासाठी पेटतात, त्यामुळे डोंगरावरील झालांना आग लागते. काही काळानंतर ती आग विझते पण तोपर्यंत डोंगराच्या दुसऱया भागातील झालांना आग लागलेली असते. त्यामुळे हा डोंगर सातत्याने जळण असल्याचे दिसते. या देशात अन्यत्रही अशा रासायनिक पदार्थांपासून निर्माण झालेली स्थाने आहेत.









