महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे भूस्खलनामुळे एक संपूर्ण मानववस्तीच दबली गेली असून या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच पुणे जिल्ह्यातील माळीण येथे झालेल्या भूस्खलनामुळे झालेल्या भीषण हानीची आठवण ताजी करणारी ही दुर्घटना आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. ज्या गावात ही दुर्घटना घडली ते डोंगरावर आहे. तो डोंगरच या भूस्खलनात धाराशायी झाला. त्यामुळे त्यावर असणारी 50 च्या आसपास घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली. आपत्कालीन साहाय्यता कार्याला त्वरित प्रारंभ करण्यात आला आणि अनेक जणांचे जीव वाचविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, अशा घटना वारंवार का घडतात आणि त्या घडू नयेत म्हणून आधींच काही उपाययोजना करण्यात येऊ शकते का, यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. आपल्याकडे कोणतीही दुर्घटना घडली की काही दिवस त्यावर जोरदार चर्चा चालते. आरोप-प्रत्यारोप होतात. अशा दुर्घटनांचे राजकारण केले जाते. सत्ताधाऱ्यांना दूषणे दिली जातात. टीव्ही, वृत्तपत्रे आणि इतर प्रसार माध्यमांवर कार्यक्रम झडतात आणि अशा प्रकारे तोंडसुख घेऊन झाले की नंतर पुन्हा पुढची दुर्घटना घडेपर्यंत सारे सामसूम होते. याचाच अर्थ असा की, अशा घटनांचे गांभीर्य फारसे कोणाला नसते. इर्शाळवाडी हा भाग भूस्खलनप्रवण नाही अशी महिती देण्यात आली आहे. तरीही ही दुर्घटना घडली, हे दुर्दैव म्हणावे लागेल. पण जे भाग भूस्खलनप्रवण आहेत हे माहीत आहे, तेथे तरी अशा घटना घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात आली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळात तंत्रज्ञान सुधारल्याने चक्रीवादळांसारख्या आपत्तींची माहिती आधी मिळते. चक्रीवादळ कोणत्या दिशेने जाणार आहे आणि ते कोणत्या भागात सागरतटावर आदळणार आहे, तसेच त्याचा वेग किती असेल ही माहिती पुष्कळशा अचूकपणे आधी समजू शकते. त्यामुळे त्या भागांमधील लोकांना आधीच सुरक्षित स्थळी नेता येणे आता शक्य होत आहे. त्यामुळे चक्रीवादळांमुळे होणारी वित्तहानी टाळता येत नसली तरी जीवीतहानी पुष्कळ प्रमाणात वाचविली जाऊ शकत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बीपरजॉय’ हे चक्रीवादळ गुजरातच्या सागरतटाला आदळले. ते तीव्र स्वऊपाचे विनाशकारी वादळ होते. तथापि, त्यात एकाही व्यक्तीला प्राण गमवावा लागला नाही. त्या प्रकारे, भूस्खलनाची माहिती आधी मिळू शकेल असे तंत्रज्ञान शोधता येईल का, यावर विचार होणे आवश्यक आहे. भूकंपाचे अनुमानही आधी हाती येईल, अशीं तंत्रवैज्ञानिक प्रगती आज झालेली आहे. तशाच प्रकारे भूस्खलनासंबंधी तंत्रज्ञान विकसीत करण्याचे आव्हान आपल्या उच्चशैक्षणिक संस्थांनी, सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खासगी क्षेत्रातील प्रयोगशाळांनी आणि उद्योगांनी स्वीकारल्यास आणि तसे संशोधन केल्यास त्याला लाभ होण्यासारखा आहे. नैसर्गिक आपत्ती रोखता येत नाहीत, हे जरी खरे असले तरी त्यांच्यापासून होणारी जीवीत किंवा वित्तहानी टाळता येते. किमानपक्षी कमी करता येते हे गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या अनेक अशा प्रसंगांमधून सिद्ध झालेले आहे. ज्या प्रदेशांमध्ये मोठ्या पर्वतरांगा आहेत, तेथे भूस्खलनाच्या घटना नेहमी घडत असतात. सह्याद्री पर्वतरांगा, हिमालयीन पर्वतरांगा आणि इतरत्र डेंगराळ भागांमध्ये पावसाळ्याच्या मोसमात सातत्याने भूस्खलन घडते. पूर्वीच्या काळी लोकसंख्या कमी होती. त्यामुळे ज्या स्थानी मोठ्या प्रमाणात आणि सतत नैसर्गिक दुर्घटना घडतात तेथे मानव वस्ती करण्याचे टाळत असे. अशी स्थाने कोणती आहेत हे त्यावेळच्या माणसाने अनुभवाने माहीत कऊन घेतले होते. पण आज लोकसंख्या प्रचंड वाढल्याने जागा मिळेल तेथे वस्ती केली जाते. कारण राहण्यायोग्य जागेची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर मानववस्ती झालेली आहे. साहजिकच नैसर्गिक आपत्ती कोसळली की अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. कुटुंबेच्या कुटुंबे धुळीला मिळतात. ही शोकांतिका टाळायची असेल पेंवा तीची तीव्रता कमी करायची असेल तर, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणे किंवा असे तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर ते आवर्जून उपयोगात आणणे याला पर्याय उरलेला नाहे. केवळ एकमेकांवर दोषारोप कऊन, तावातावाने चर्चा कऊन, एकमेकांवर जबाबदारी ढकलून, किंवा अशा घटनांचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न कऊन समस्या सुटणार नसतात. त्या सोडविण्यासाठी या सर्व क्षुद्र आणि क्षुल्लक बाबींना गाडून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असते. आज या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगल्यापैकी जागृती झाली आहे. कित्येक स्थानी नैसर्गिक दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाच्या यंत्रणेआधी सर्वसामान्य नागरिक पोहचलेले असतात आणि त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ते अडचणीत सापडलेल्यांना साहाय्य करतात. राजकीय पक्ष, त्यांच्या संस्था आणि प्रशासकीय यंत्रणा यांनीही राजकारण बाजूला ठेवून आपत्तीचे बळी ठरलेल्यांना तत्परतेने आणि भेदभाव विसऊन साहाय्यता उपलब्ध केल्यास त्यांनी त्यांचे उत्तरदायित्व समंजपणे निभावले असे म्हणता येऊ शकेल. तेव्हा केवळ दुर्घटनेचे चर्वितचर्वण करत न बसता, पिडितांना त्वरेने साहाय्य करणे आणि अशा घटना पुन्हा घडू न देणे यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. आज थोड्याफार प्रमाणात का असेना पण राजकारण्यांच्या, समाजाच्या आणि प्रशासनाच्या मानसिकतेत तसे परिवर्तन घडताना दिसत आहे, ही रास्त बाब आहे. हाच समजूतदारपणा आणि संवेदनशीलता अधिक वाढणे आणि जेव्हा समाज, राज्य किंवा देश एका समान समस्येशी संघर्ष करीत असतो तेव्हा या दोन गुणांचे प्रत्यंतर येणे आवश्यक आहे. हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ज्याच्यावर संकट कोसळले आहे, त्याच्यासमोर परिस्थितीला तोंड देणे किंवा तिच्यासमोर शरणागती पत्करणे याखेरीज उपाय नसतो. पण प्रशासकीय तसेच सामाजिक संस्था आणि राजकीय संस्था यांचे भक्कम हात त्याला आधार देण्यासाठी एकोप्याने पुढे आले, तर अशा आपत्तींमध्ये सर्वस्व गमावलेल्यांना मोठा आधार मिळून ते नव्या उत्साहात आणि नव्या जोमात आपल्या जीवनाचा पुनरारंभ कऊ शकतात.
Previous Articleसात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत
Next Article स्पोर्ट्स mania
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








