अपत्याचा जन्म व्हायचा असेल, तर स्त्री आणि पुरुष यांचे मिलन व्हावे लागते, असा नियम आहे. सर्व सस्तन प्राण्यांसाठी हा नैसर्गिक नियम असून तो माणसालाही लागू आहे. कारण, पुरुष आणि स्त्री यांच्या संयोगातून मानवाची पुढची पिढी जन्माला येत असते. तथापि, आज विज्ञानाने एवढी क्रांती केली आहे, की मातेशिवायच अर्भकाचा जन्म होणे शक्य आहे. अमेरिकेतील ओरेगॉन येथील ‘हेल्थ अँड सायन्स विद्यापीठाच्या संशोधकांनी एक अशी प्रक्रिया शोधून काढली आहे, की जिच्यामुळे दोन पुरुष एकत्र येऊन बाळाला जन्म देऊ शकतात.
या प्रक्रियेत महिलेने दान केलेल्या स्त्रीबीजातील पेशीकेंद्र काढून ते पुरुषाच्या त्वचेच्या पेशीत घातले जाते. त्यातून निर्माण झालेल्या ‘अंड्या’चा चे फर्टीलायझेशन पुरुषाच्या वीर्याशी त्याचा संयोग करुन केले जाऊ शकते. या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत ‘मिटोमिऑसिस’ असे संबोधले जाते. या प्रक्रियेच्या माध्यमातून आतापर्यंत संशोधकांनी 82 ‘अंडी’ निर्माण केली आहेत. अर्थातच, हा शोध अद्याप बाल्यावस्थेत आहे. तसेच, कायदा आणि नैतिकता यांचेही मुद्दे या प्रयोगांच्या संबंधात उपस्थित केले जात आहेत. तथापि, मातेशिवाय अर्भकाचा जन्स ही संकल्पना या संशोधनामुळे सिद्ध झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
हे प्रयोग यशस्वी झाल्यास समलिंगी विवाह करणाऱ्या पुरुषांनाही मुले होऊ शकतील, असे प्रतिपादन करण्यात येत आहे. तसेच ज्या महिलांना अंडे निर्मितीत समस्या उद्भवतात, त्यांच्यासाठीही हे संशोधन मोलाचे ठरेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या संबंधात आणखी सखोल संशोधन करण्याची आवश्यकता असून त्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. पण ते यशस्वी झाल्यास तो वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गातील आणखी एक ‘मैलाचा दगड’ ठरणार आहे. अमेरिकेप्रमाणे इतर काही देशांमध्येही असे प्रयोग केले जात आहेत. काही तज्ञांनी मात्र, असे प्रयोग करणे म्हणजे निसर्गाच्या प्रक्रियेत नको इतकी ढवळाढवळ करण्यासारखे आहे, असा आरोप केला आहे. मात्र, वैज्ञानिक प्रयोग करण्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. पुढे व्यापारी तत्वावर हा प्रयोग न्यायचा की नाही, हे नंतर ठरणार आहे, असे ही प्रक्रिया शोधून काढलेल्या संशोधकांचे मत आहे.









