जत तालुक्यातील सिंदूर येथील दुर्दैवी घटना
वळसंग वार्ताहर
जत तालुक्यातील सिंदूर येथे गर्भवती मातेने दोन चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लक्ष्मीबाई धानेशा माडग्याळ (वय.२३), दिव्या धानेशा माडग्याळ (वय २), श्रीशैल धानेशा माडग्याळ (वय.१)असे आत्महत्या केलेल्या मातेसह बालकाची नावे आहेत. ही घटना रविवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सिंदूरचे पोलीस पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. ही आत्महत्या कौटुंबिक कलहातून झाल्याची चर्चा सुरू होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मीबाई हिचा अगोदर विवाह जवळच्या नातेसंबंधातील तरुणाशी झाला होता झाला. परंतु तिने विवाहानंतर सिंदुर येथील धानेशा याच्यासोबत चार वर्षांपूर्वी पळून जावून लग्न केले होते. लक्ष्मी व धानेशा या दोघांनी पळून जावून लग्न केल्याने लक्ष्मीच्या माहेरची मंडळी नाराज होती. लक्ष्मीच्या संपर्कात माहेरचे कोणीच नव्हते. लक्ष्मी व धानेशा हे दोघे सिंदूर गावापासून तीन किलोमीटर असलेल्या कर्नाटक हद्दीलगत राहत होते . त्यांना दोन वर्षांची दिव्या तर एक वर्षाचा श्रीशैल हा मुलगा होता. लक्ष्मी ही तीन महिन्याची गरोदर होती. रविवारी पती धानेशा व सासरा हे शेतात औषध फवारणीसाठी गेले होते. तर सासू ही वैरण आणण्यासाठी गेली असता लक्ष्मी हिने दिव्या व श्रीशैल या दोन्ही चिमुकल्याच्या सोबत घेत शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, विहिरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या लक्ष्मी व तिच्या दोन्ही मुलाला जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मी हिच्या माहेरचे लोक जत ग्रामीण रुग्णालयात जमा झाले.त्यानी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.