वृत्तसंस्था / लंडन
ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिन गोलंदाज नाथन लियॉन याने इंग्लंडच्या नव्या आणि गाजावाजा झालेल्या ‘बाझबॉल’ तंत्राची खिल्ली उडविली आहे. इंग्लंडच्या या वेगवान फलंदाजी करण्याच्या तंत्राने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी क्रांती घडविली आहे, अशी चर्चा आहे. तथापि, या तंत्राने कोणतेही विशेष परिवर्तन झालेले नसून केवळ बोलबाला झाला आहे, अशी स्पष्टोक्ती लियॉन याने केली.
गेल्या दोन अॅशेस मालिकांमध्ये इंग्लंडच्या संघाने वेगवान फलंदाजी करण्याच्या नव्या तंत्राचा उपयोग केला होता. हे तंत्र इंग्लंडचा नवा कसोटी प्रशिक्षक ब्रँडन मॅकुलम याने विकसीत केले आहे, असे म्हटले जाते. मॅकुलम याला ‘बाझ’ टोपणनावाने ओळखले जाते. त्यामुळे या तंत्रालाही ‘बाझबॉल’ असे संबोधले जाते. हे संबोधन ‘बेसबॉल’ या अमेरिकन खेळाच्या नावाला जवळचे आहे. बेसबॉल ज्याप्रमाणे वेगवान पद्धतीने खेळला जातो, त्याचप्रमाणे या तंत्राने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी वेगवान केली जाते. तथापि, लियॉन याने या तंत्राविषयी प्रतिकूल मत व्यक्त करताना ते फारसे प्रभावी नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हे तंत्र नव्हते तेव्हाही ऑस्ट्रेलियाचे फलंदाज वेगवान फलंदाजी करतच होते. डेव्हिड वॉर्नर हा फलंदाज याचे उत्तम उदाहरण आहे. शेवटी, कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान फलंदाजी परिस्थिती पाहूनच केली जाणे आवश्यक आहे. तसेच ते फलंदाजांची शैली आणि वृत्ती यांवरही अवलंबून आहे, असे लियॉनचे म्हणणे आहे.









