13 कोटी वर्षे जुन्या डायनासोरच्या पंज्याचा दिसला ठसा
जगातील अनेक भागांमध्ये सध्या असहय़ उष्णतेमुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे सरोवरांची पाणीपातळी सातत्याने खालावत आहे. आजवर ज्या सरोवर अन् नद्यांनी स्वतःच्या तळाला रहस्य लपवून ठेवली होती. ही रहस्य आता पाणीपातळी खालावू लागल्यावर समोर येऊ लागली आहेत. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये देखील आता दुष्काळामुळे चकित करणारी गोष्ट आढळली आहे. येथील नदी कोरडी पडल्याने डायनासोरच्या पंज्याचे ठसे मिळाले आहेत. हे ठसे 13 कोटी वर्षांपूर्वीचे असून ते डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमध्ये एक नदी कोरडी पडल्यावर दिसून आले आहेत.

पार्कमध्ये आढळून आलेल्या बहुतांश ठशांना अलिकडेच पाहिले गेले आहे. हे एक्रोकँथोसोरस नावाच्या डायनासोरचे आहेत. हा एक प्रौढ डायनासोर राहिला असावा. तसेच तो 15 फूट लांब आणि जवळपास 7 टन वजनाचा असावा. दुसरी प्रजाती ग्लेन रोजमध्ये आढळून आली त्यात सोरोपोसीडॉनच्या पंज्याचे ठसे आहेत, हा डायनासोर सुमारे 60 फूट लांब आणि 44 टन वजनी राहिला असेल अशी माहिती डायनासोर पार्कच्या प्रवक्त्या स्टेफनी सेलिनास गार्सिया यांनी दिली आहे.
टेक्सासमध्ये दुष्काळ
यंदा उष्णता अधिक असल्याने पार्कमधील एक नदी जवळपास पूर्णपणे कोरडी पडली आहे. यामुळे डायनासोरच्या पंज्यांचे ठसे समोर आले आहेत. टेक्सास प्रांताचा 60 टक्के हिस्सा दुष्काळाला सामोरा जात आहे. मागील काही दिवसांमध्येच तापमानात 3 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. यासंबंधी प्रशासनाकडून आता खबरदारीची सूचना लोकांना करण्यात आली आहे.









