रत्नागिरी प्रतिनिधी
शहराजवळील भाट्ये येथील खाडीत बुडून अल्पवयीन मुलगा आणि तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास घडली. रेहान अब्दुल्ला शेख (11, रा.क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) आणि प्रणय रघुनाथ जाधव (24,रा.कोकणनगर मराठी शाळेजवळ,रत्नागिरी) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मतीन अमीरुद्दीन सोलकर (38,रा.राजीवडा नाका,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांना खबर दिली.
त्यानूसार,रविवारी दुपारी 2.30 वा.सुमारास यातील रेहान शेख आणि त्याच्या सोबत असलेला प्रणय जाधव हे दोघे भाट्ये येथील खाडीत बुडत असल्याचे पाहून तिथे जवळच उभ्या असलेला अबुबखर अब्दुल्ला शेख (38) हा मोठ्याने ओरडला. त्याचे ओरडणे ऐकून राजीवडा येथे राहणारे अमीरुद्दीन सोलकर यांनी दिलदार कासम पावसकर यांच्या मदीतीने पाण्यात उडी मारली.
त्यांनी रेहान शेख आणि प्रणय जाधव या दोघांनाही खाडीच्या पाण्यात बुडताना बाहेर काढले. या दोघांच्याही नाकातोंडात पाणी गेल्याने ते दोघेही बेशुध्द झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी 3.30 वा.सुमारास जिल्हा रुग्णालयातील डॉ.गोविंद आंबाडे यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले. दरम्यान,दोघांचेही नातेवाईक जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाले होते. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या ताब्यात दोघांचेही मृतदेह देण्यात येणार आहेत.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची कार्यवाही सुरु होती.