वृत्तसंस्था /नियामी
पश्चिम आफ्रिकेतील देश नाइजरमध्ये सैन्याने गुरुवारी सत्तापालट घडवून आणला आहे. काही सैनिकांनी राष्ट्रपती भवनात शिरून त्यावर कब्जा केला आहे. याचबरोबर राष्ट्रपती मोहम्मद बज्म यांना सत्तेवरून हटवत कैद करण्यात आले आहे. सैन्याने सत्तापालटाची घोषणा राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर केली आहे. कर्नल अमादौ अब्द्रमाने यांनी अन्य सैन्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती बज्म यांना सत्तेवरून हटविल्याचे सांगितले आहे. बिघडती सुरक्षास्थिती, खराब प्रशासनामुळे आम्ही राष्ट्रपती शासन समाप्त करत आहोत. नाइजर देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. पूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत अशी माहिती कर्नल अब्द्रमाने यांनी दिली आहे. याचदरम्यान अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी नाइजरच्या राष्ट्रपतींना शक्य ती सर्वप्रकारची मदत करणार असल्याचे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव एंटोनियो गुतेरेस यांनीही राष्ट्रपतींशी संपर्क साधल्याचे सांगत त्यांना पूर्ण समर्थन असल्याचे वक्तव्य केले आहे. तर नाइजरच्या सैन्याने विदेशी हस्तक्षेपाच्या विरोधात इशारा देत परिणाम भोगण्यासाठी तयार रहा असे म्हटले आहे.









