जगद्गुरु रेणुकाचार्य जयंती साजरी
बेळगाव : जगद्गुरु रेणुकाचार्य लिखित ‘सिद्धांत शिखामणी’ पुस्तकातून जीवन जगण्याचा संदेश मिळतो. या पुस्तकातील तत्त्वे आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन विजापूरच्या पदव्युत्तर अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. एस. एम. गंगाधरय्या यांनी केले. जिल्हा प्रशासन, जि. पं., कन्नड-सांस्कृतिक खाते व मनपा बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार गंधर्व रंगमंदिरात रविवारी जगद्गुरु रेणुकाचार्य जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विशेष व्याख्यानात डॉ. गंगाधरय्या बोलत होते. वीरशैव लिंगायतांच्या मठांतून सर्व समाजाला अन्न आणि आश्रय देण्यात येतो. उत्तर कर्नाटकात मठांचे कार्य अद्वितीय आहे. वीरशैव लिंगायत समाज सर्व समाजाशी एकरुप होऊन पुढे गेला पाहिजे. सर्व समाजातील जनतेने रेणुकाचार्यांची तत्त्वे जाणून घेऊन त्यांचे आचरण केले पाहिजे. आपल्या मुलांवरही संस्कार घडविले पाहिजेत, असेही गंगाधरय्या म्हणाले.
हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी, नागनूर रुद्राक्षी मठाचे अल्लमप्रभू महास्वामी, अरळीकट्टी तोंटदार्य विरक्त मठाचे शिवमूर्ती महास्वामी यासह विविध मठाधीश व जयंती उत्सव समितीचे मानद अध्यक्ष माजी आमदार महांतेश कवटगीमठ, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरय्या सवडी, कल्लाप्पा गाणगेर, विजय जाधव, एम. बी. जिरली, रत्नप्रभा बेल्लद, निलगंगा चरंतीमठ आदी उपस्थित होते. तत्पूर्वी जगद्गुरु रेणुकाचार्य यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक झाली. राणी चन्नम्मा चौकामध्ये प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध मठाधीश तसेच अधिकारीवर्ग सहभागी झाला होता. सिव्हिल हॉस्पिटल रोड, कोल्हापूर सर्कलमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.









