अध्याय सत्रावा
भगवंत म्हणाले, विषयाचा स्वार्थ सोडून देऊन जो जिवाभावापासून मजवर भाव ठेवतो, तोच माझा खरा भक्त होय. भक्त म्हणावयाचे आणि धनार्जन करावयाचे, हेच भक्तीला मुख्य विघ्न आहे. उद्धवा ! धनलोभी म्हंटला की तो निखालस अभक्त म्हणून समजावा. जेथे माझी भक्ती असते तेथे मी जाती किंवा कुळ पहात नाही. मी माझ्या भक्तांना भक्तीनेच त्वरित वश होतो. जेथे भक्तीभावाने माझी आवड असते तेथे आवश्य माझी उडी पडते. भावार्थाची ज्याने गुढी उभारली तोच माझ्या भक्तीची गोडी जाणतो. जे जे दिसेल ते ते देवच आहे अशा भावनेने ज्यांचा भक्तिभाव आहे, तोच एक माझा आवडता होय. उद्धवा ! त्याच्याच भक्तीवर आम्ही जगत असतो. माझा जीव प्राण तोच. त्याच्यावरून मी सर्वस्व ओवाळून टाकतो. व्यालेली गाय जशी सर्वदा वासराच्या अधीन असते, त्याप्रमाणे मीही त्याच्या अधीन असतो.
तात्पर्य, उद्धवा ! निःसीम अशी भाविकपणाची अवस्था तिचंच नाव माझी भक्ती. ह्याप्रमाणे भक्तीचे लक्षण आहे. आता दयेचे स्वरूप ऐक. मूल संकटांत पडलेले पाहिले म्हणजे ज्याप्रमाणे आई ते दुःख असह्य होऊन तत्काळ साहाय्याकरिता उठते त्याप्रमाणे कोणी दीन दृष्टीस पडला की, त्याच्या पोटात दया उत्पन्न होते अशी दया उत्पन्न झाली म्हणजे मग आपले आणि परके कोण पाहतो ? हा आपल्या जातीचा आहे की परक्मया जातीचा आहे इतकी चौकशी करण्याइतकाही धीर त्याला नसतो.
महापुरात बुडत असणाऱयाला दयाळू मनुष्य त्याची जात कोणती आहे हे विचारीत बसत नाही, आधी उडी टाकून त्याला वाचवितो. याचेच नाव दया.
दीनावर ‘दया’ करण्यासाठी जो जळत्या आगीतसुद्धा उडी घालतो, त्याचे मी चरणवंदन करतो. जगामध्ये दयाळू मनुष्य धन्य होय. अशा दयेच्या गुणाने मला अनंताला त्याने जीवाभावासह विकतच घेतलेले असते किंवा मी त्याचा पोसणाराच झालेला असतो. म्हणून दयाशील मनुष्याच्या घरी मी पाहिजे ते काम करतो. दयाळू मनुष्यावर जो जो काही प्रसंग येतो, तो नेहमी माझ्याच माथ्यावर असतो. उद्धवा! जो दीनजनाचा विचार करतो, जो खरोखर दीनदयाळू असतो, तो माझे केवळ भांडार होय. तो माझे केवळ सुखाचे सार होय. आता सत्याचे संपूर्ण लक्षण तुला सांगतो ऐक. सत्याचा सत्यपणा असा आहे की, जागृती स्वप्नं किंवा सुषुप्तीमध्येसुद्धा ज्याला असत्यपणा शिवत नाही हेच परिपक्व झालेले ‘सत्य’ होय. अशा प्रकारचे सत्य अंतःकरणात पूर्णतेस पोचले म्हणजे वाणीही सत्य होते व दृष्टीही सत्यच होते. अंतःकरणातील सत्यत्वाने सर्व सृष्टीच सत्यमय होऊन जाते आणि असत्य राहात नाही. सत्य हे अशा प्रकारचे असते हे लक्षात ठेव. हे दहावे लक्षण होय. हेच ब्राह्मणांचे स्वभावसिद्ध कर्माचरण असते. बाह्मणप्रकृतीच्या क्षेत्रामध्ये या दहा लक्षणांची उत्पत्ती होत असते. उद्धवा ! ब्राह्मणांची ही स्थिती स्वयंभू साहजिक व अकृत्रिम असते. आता क्षत्रियांच्या प्रकृतीचे जे गुण आहेत त्यांचे निरूपण ऐक. तेज म्हणजे प्रतापाचे सामर्थ्य, जणू काय भूतलावरील सूर्यच. ज्याच्या प्रतापाच्या तेजाने सारे राजे लोपून जातात क्षात्रधर्मातील जो पहिला गुण त्याचेच नाव ‘तेज’ आता क्षत्रियाच्या बळाचा चमत्कार सांगतो ऐक. त्याच्या शरीरसामर्थ्याचा इतका चमत्कार असतो की, तो एकटाही लाखो मनुष्यांवर तुटून पडतो आणि मस्तक तुटले तरी धडाने शत्रुचे तोंड फोडतो. तो समरांगणांत शिरला म्हणजे दुसऱयाचे आपल्याला साहाय्य आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही. रानहत्तींमध्ये सिंह घुसून जसा त्यांचा फडशा पाडतो, त्याप्रमाणे सैन्यांत मुसंडी देऊन तो मोठमोठय़ा वीरांचा सफाया करतो. आकाशाने कोसळून पडण्यासाठी जरी गडगडाट केला, पृथ्वी उलथून पडण्यासाठी जरी हडबडली, तरी त्याच्या धैर्याचे एक रोमही वाकडे होत नाही. कल्पांतसमय जरी प्राप्त झाला, तरी त्याच्या चित्ताला धाक म्हणून वाटतच नाही. अशा प्रकारचे जे स्वभावसिद्ध अढळ धैर्य, त्यालाच धृती असे म्हणतात.







