तळेरे / प्रतिनिधी
तळेरे येथील संवाद परिवाराच्यावतीने उभरता गायक हर्ष नकाशे यांच्या गायनाचा ‘हर्ष गान’ या विशेष संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दि.२२ मे रोजी सायंकाळी ठीक ७ वा. तळेरे येथील “मधुकट्टा” येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
तळेरे पंचक्रोशीत हर्ष नकाशे (नाधवडे) हा उभरता गायक दर्जेदार रीतीने नावारूपाला येत आहे.त्याचबरोबर त्याची संगीत कला विकसित होऊन बहरत आहेत. शास्त्रीय संगीताचा पाया ज्याचा पक्का असतो त्याच्यासाठी कोणतेही गायन मग ते भक्ती संगीत, भावगीत असो की नाट्यगीत असो, त्यात सहज रंग भरू शकतो. हर्ष नकाशे उत्तम शास्त्रीय संगीताची सेवा करत आहे.
हर्ष नकाशे हे पं. संजीव अंभ्यकर आणि सौ.विश्रांती कोयंडे यांच्याकडे संगीत शिकत आहे. तर अनेक ठिकाणी त्यांच्या संगीत मैफिली झाल्या असून तळेरे पंचक्रोशीतील रसिकांसाठी प्रथमच या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.