ज्ञानेश्वरी गाडगे हिने रिझविले : मर्कंटाईल सेवा संघ आयोजित स्वरसंध्या कार्यक्रम
बेळगाव : गायक, वादक, निवेदक यांचा मिलाफ झाला आणि समोर नेमक्या जागी दाद देणारे चोखंदळ रसिक असले की मैफल उत्तरोत्तर रंगत जाते. नेमके याचेच प्रत्यंतर मर्कंटाईल सेवा संघ आयोजित स्वरसंध्या या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी गाडगे हिच्या मैफलीने दिले. रामनाथ मंगल कार्यालयात झालेल्या या मैफलीत तिला वादकांची अत्युत्तम साथ लाभली आणि सुरेल मैफलीने रसिकांना स्वर वर्षावात चिंब केले. ज्ञानेश्वरी हिने या मैफलीचा प्रारंभ ‘प्रथम तुला वंदितो’ या गीताने केला. त्या पाठोपाठ ‘सूर निरागस हो’ या गीताने श्रोत्यांना रिझविले. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या गाजलेल्या गीतांनी त्यांनी स्वरांचे चांदणेच शिंपले. त्यानंतर ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यागीत गाऊन लगेच ‘भाग्यद लक्ष्मी बारम्मा’ या भक्तिगीताने लक्ष्मीची आळवणी केली. ‘मनी नाही भाव, देवा मला पाव’ या गीताचा आस्वाद रसिक घेतात तोच तिने लगेच प्रसिद्ध अशा ‘वाजले की बारा’ या लावणीने टाळ्या मिळविल्या. त्यानंतर ‘सुरत पिया की’ या भैरवीने सांगता केली.
ज्ञानेश्वरी ही सारेगमपच्या लिटल चॅम्पच्या नवव्या सत्राची उपविजेती आहे. आवाजावर तिची विलक्षण पकड दिसून आली. स्वरावर असणारी तिची हुकुमत कौतुकास्पदच आहे. ज्ञानेश्वरीला केशव धोंडे व गणेश गाडगे यांच्या सहगायनाची उत्तम साथ मिळाली. ही मैफल रंगण्यामध्ये गायनाबरोबरच वादकांचे तालबद्ध वादन तितकेच महत्त्वाचे ठरले. वास्तविक वादन हे मूळ गायनाला साथसंगत देणारे असते. परंतु या मैफलीमध्ये प्रत्येक वादकाचा स्वतंत्र असा आविष्कार पाहायला मिळाला. हरी भगुरे (पखवाज), पवन उदे (तबला), कार्तिकी गाडगे (संवादिनी), पंकज जाधव (की बोर्ड), चैतन्य सावळे (टाळ) यांच्या वादनाला रसिकांच्या टाळ्या मिळाल्या. पाल्हाळ न लावता या मैफलीचे नेटके व नेमके निवेदन प्रा. अनघा वैद्य यांनी केले. प्रारंभी मर्कंटाईलचे अध्यक्ष संजय मोरे यांनी सर्व गायक, वादकांचा सत्कार केला. सूत्रसंचालन आसावरी भोकरे यांनी केले. बुधवारी स्वरसंध्याअंतर्गत अनुष्का शिकतोडे व आदेश तेलंग यांचे गायन होणार आहे.









