प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी नाला परिसरातील जमिनीला दरवर्षीच फटका बसत आहे. त्यामुळे या नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. याबाबत आता पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी लक्ष घातले आहे. शहर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी गोकाक येथे भेट घेऊन या नाल्याची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची संपूर्ण माहिती दिली आहे. यावर तातडीने पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.
बळ्ळारी नाल्यामुळे दरवर्षीच पिकांचे नुकसान होत आहे. हजारो एकर जमिनीतील पिके खराब होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे गेल्या दहा दिवसांपासून बळ्ळारी नाला परिसराला पूर आला आहे. जमिनीतील भातपीक पाण्याखाली गेल्याने यावर्षीही कुजून जाणार आहे. बळ्ळारी नाल्याबरोबरच या नाल्याला जोडणाऱ्या नाल्यांचीही खोदाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडच्या बाजूला पाणी जाण्यासाठी योग्य ती सोय करणे गरजेचे आहे, असेही यावेळी पालकमंत्र्यांना सांगण्यात आले.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हणणे ऐकून घेऊन लवकरच जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी काँग्रेसच्या प्रभावती चावडी, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी पालकमंत्र्यांना संपूर्ण माहिती दिली आहे.









