जयंत पाटील यांचे आश्वासन ः म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी घेतली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमावासियांच्या व्यथांची मला जाणीव आहे. त्यांच्यावर होणारे अन्याय मला माहीत आहेत. त्यामुळे सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत. येत्या पंधरा दिवसांत तज्ञ समितीची बैठक बोलाविली जाईल. त्यानंतरच बेळगावला येऊ, असे आश्वासन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व तज्ञ समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी म. ए. समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने शनिवारी सांगली येथे जयंत पाटील व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच म. ए. समितीने त्यांची भेट घेतली. भाई एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची नेमणूक महाराष्ट्र सरकारने केली आहे.
म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी जयंत पाटील यांना बेळगाव भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी त्यांनी तज्ञ समितीची बैठक घेऊन त्यानंतरच बेळगावला भेट देऊ, असे सांगितले. तज्ञ समितीच्या बैठकीनंतर उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, एपीएमसीचे सदस्य महेश जुवेकर यांसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.









