वृत्तसंस्था /गुवाहाटी
पूर्व आणि ईशान्य भारतातील 12 राज्यांमधील भाजप नेत्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंबंधी रणनीति तयार करण्यासाठी गुरुवारी आसाममध्ये मोठी बैठक घेतली आहे. या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि पक्षाच्या खासदारांमसवेत आमदार अन् प्रदेशाध्यक्ष सामील झाले आहेत. या बैठकीत पक्षसंघटन मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीति ठरविण्यावर चर्चा झाली आहे. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे या दिशेने आम्ही काम करत आहोत असे उद्गार आसाम भाजप अध्यक्ष भावेश कालिता यांनी काढले आहेत. आमचा पक्ष केवळ निवडणुकीपूर्वी तयारी करत नाही, तर पूर्ण वर्षभर जनतेच्या संपर्कात असतो. या बैठकीत पूर्व आणि ईशान्येतील सर्व राज्यांमधील पक्षाच्या संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे भाजप नेते वैयंजत पांडा यांनी सांगितले आहे. या 12 राज्यांमध्ये एकूण 142 लोकसभा मतदारसंघ आहेत, 2019 मध्ये यातील 68 जागांवर भाजपने विजय मिळविला होता. ईशान्येतील 8 राज्यांमध्ये 25 मतदारसंघ आहेत. यात आसाममध्ये सर्वाधिक 14 जागा आहेत. अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर तसेच त्रिपुरामध्ये प्रत्येकी दोन तर मिझोरम, नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. पूर्वेकडील पश्चिम बंगालमध्ये 42, बिहारमध्ये 40, ओडिशात 21 आणि झारखंडमध्ये 14 लोकसभा मतदारसंघ आहेत.









